Join us  

गंगा नदीच्या मातीतून देवीच्या मूर्तीला आकार; नैसर्गिक साधनांचा वापर, ईको फ्रेंडली मूर्ती, ४५ वर्षांपासूनचा व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 2:42 AM

नवरात्रौत्सवाने मुंबापुरीत रंग भरलेले असतानाच, येथील देवीच्या मूर्तीही मुंबईकरांचे आकर्षण ठरत आहेत. विशेषत: मुंबईतील बंगाली बाधवांनी प्रतिष्ठापना केलेल्या देवीच्या मूर्ती कौतुकाचा विषय असून, या मूर्ती साकारण्यासाठी थेट गंगा नदीची माती वापरण्यात आली आहे.

- कुलदिप घायवट ।मुंबई : नवरात्रौत्सवाने मुंबापुरीत रंग भरलेले असतानाच, येथील देवीच्या मूर्तीही मुंबईकरांचे आकर्षण ठरत आहेत. विशेषत: मुंबईतील बंगाली बाधवांनी प्रतिष्ठापना केलेल्या देवीच्या मूर्ती कौतुकाचा विषय असून, या मूर्ती साकारण्यासाठी थेट गंगा नदीची माती वापरण्यात आली आहे. बंगाल क्लबसह उर्वरित बंगाली बांधवांच्या मंडळांनी गंगा नदीच्या मातीपासून साकारलेल्या देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठाना केली असून, खास कोलकाता येथून मुंबईत दाखल झालेल्या मूर्तिकारांनी दादर येथील शिवाजी पार्क मैदानाशेजारी मूर्तिकलेचे कौशल्य साकारले आहे.मुंबईमध्ये मूर्ती बनविण्यासाठी अनेक कार्यशाळा आहेत. अनेक मूर्तिकार आपली मूर्तिकला सादर करण्यासाठी अनेक प्र्रकारे काहीतरी नवीन करतात. काही मूर्तिकार हे प्लास्टर आॅफ पॅरिस किंवा माती वापरून मूर्ती घडवितात, पण या सर्वांच्या अगदी वेगळा विचार करणारा, नैसर्गिक साधनांचा वापर करून, ईको फे्रंडली मूर्ती घडविणारा असा एक मूर्तिकार आहे, जो खूप लांबचा प्रवास करून, मूर्ती बनविण्यासाठी खास मुंबईमध्ये येतो. त्याचे नाव आहे मूर्तिकार अमित पाल. विशेष म्हणजे, गंगेच्या मातीपासून मूर्ती बनविण्याची कला त्यांच्याकडे आहे.कोलकाताचे रहिवासी असलेले मूर्तिकार पाल हे खास नवरात्रीच्या निमित्ताने मुंबईमध्ये दाखल होऊन देवीच्या मूर्ती साकारतात. मुंबईमधील अनेक मंडळांसाठी ते मूर्ती बनवितात. गंगा नदीजवळच्या भागात ते आपला ४५ वर्षांपासूनचा वडिलोपार्जित मूर्ती बनविण्याचा व्यवसाय सांभाळत आहेत.नवरात्रीच्या ३ महिने अगोदरच २० ते २५ जणांचा मूर्तिकार समूह मुंबईमध्ये दाखल होतो. मूर्ती बनविण्यासाठी विशेष करून बांबू, गवत, लाल माती यांचा ८० टक्के वापर केला जातो. संपूर्ण मूर्ती बनवून झाल्यावर, त्यावर गंगेच्या मातीचा, बेले मातीच (गंगा नदीतील वाळू) मुलामा दिला जातो. नैसर्गिक रंगाचा वापर करून, या मूर्ती रंगविल्या जातात. मूर्ती ही भक्तांच्या मागणीप्रमाणे बनविली जाते. देवीच्या मूर्ती या सिंह, वाघ, राक्षसाचा वध करताना साकारल्या आहेत. पाच फुटांपासून ते पंधरा फुटांपर्यंतच्या देवीच्या मूर्ती बनविण्यात आल्या आहेत. मुंबईतील नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गापूजा समिती, बंगाल क्लब दुर्गा उत्सव, लोखंडवाला दुर्गा कमिटी, पवई बंगाल वेल्फेअर असोसिएशन या मंडळांसह अनेक घरांमध्ये अमित यांच्या मूर्ती विराजमान होतात. नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गापूजा समिती या मंडळाची मूर्ती ही सर्वांत मोठी असते. हे मंडळ सर्वांत जुने असून, त्याला ७० वर्षे पूर्ण होत आहेत. या वेळेस नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गापूजा समितीसाठी १७ फु टांची मूर्ती साकारण्यात आली आहे.प्रत्येक नदीची माती ही वेगवेगळी असते. काही नद्यांची माती रेताड, चिकट प्रकारातील असते. त्यामुळे प्र्रत्येक नदीच्या मातीतून मूर्ती साकारता येऊ शकत नाही. गंगा नदीला पवित्र मानले जाते. त्यामुळे गंगेची माती ही पवित्र मानून देवीच्या मूर्तीसाठी वापरली जाते. मूर्ती बनविताना देवीच्या डोळ्यांतील तेज, हातातील शस्त्रे या गोष्टीवर जास्त भर दिला जातो, असे अमित सांगतात.

टॅग्स :नवरात्रौत्सव २०१७