Join us

शालू ह्युमनॉइड रोबोट साधते ४७ भाषांमध्ये संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:27 IST

संपूर्ण भारतीय बनावट : केंद्रीय विद्यालयाच्या विज्ञान शिक्षकाची निर्मितीफाेटाे आहे. सीडीच्या मेलवर मेल केला आहे. शालू राेबाेट या ...

संपूर्ण भारतीय बनावट : केंद्रीय विद्यालयाच्या विज्ञान शिक्षकाची निर्मिती

फाेटाे आहे. सीडीच्या मेलवर मेल केला आहे. शालू राेबाेट या नावाने.

फाेटाे ओळ - शालू राेबाेटसह तिची निर्मिती करणारे शिक्षक दिनेश पटेल.

सीमा महांगडे

मुंबई : आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये अवतरलेली पहिली ह्युमनॉइड म्हणून सोफियाची ओळख भारतीयांना आहेच, मात्र भारतीय बनावटीची ह्युमनॉइड म्हणून आयआयटी संकुलातील केंद्रीय विद्यालयाच्या विज्ञान शिक्षकाने शालूची निर्मिती केली आहे. ती ४७ भाषांत संवाद साधण्याची किमया करते. यात ९ भारतीय भाषांचा समावेश आहे.

कोरोनाकाळात शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी अजूनही संसर्गाचा धाेका शिक्षक व विद्यार्थी दोघांना आहेच. अशा परिस्थितीत तंत्रज्ञानाचा वापर करून ह्युमनॉइड रोबोटच्या साहाय्याने मनाेरंजनातून शिक्षणाचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला तर शिकणे साेपे हाेईल, या उद्देशाने शिक्षक दिनेश पटेल यांनी शालूची निर्मिती केली. मराठी, हिंदी, भोजपुरी अशा प्रकारे एकूण ९ भारतीय तर फ्रेंच, इंग्रजी, जापनिज, जर्मन अशा ३८ परदेशी भाषांत शालू संवाद साधू शकत असल्याची माहिती त्यांनी दिली.

शालूची निर्मिती करताना पटेल यांनी स्थानिक बाजारातील साधने, उपकरणांचा वापर केला. याच्या निर्मितीसाठी ३ वर्षांचा कालावधी लागला. ॲलेक्साप्रमाणे यात माहिती फीड करण्यात आली असून शालू संवाद तर साधतेच, साेबतच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही देत असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या शालू रोबोटचे हे प्रोटोटाइप म्हणजे नमुना दाखल व्हर्जन असून भविष्यात पटेल यांना ते अधिक विकसित करायचे आहे. याच अनुषंगाने शालू-२ च्या निर्मितीसाठी ते तयारी करत आहेत.

* शिक्षणासाेबत मनोरंजनाची सांगड

शालूला देशाचे पंंतप्रधान, राष्ट्रपती तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव अशी बरीच माहिती अवगत आहे. देशातील इतिहास आणि भूगाेलाशी संबंधित माहितीही ती देऊ शकते. विद्यार्थ्यांना शालूच्या रूपाने तंत्रज्ञानाची झलक दाखवून शिक्षण व मनोरंजनाची सांगड कशी घालता येते, हेही दाखवून द्यायचे असल्याचे पटेल यांनी सांगितले. शालूला अधिक विकसित करून भारतामार्फत जगाला अधिक प्रगल्भ तंत्रज्ञानाची ओळख करून देता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

...........................

...........................