शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 07:37 IST2025-06-25T07:35:42+5:302025-06-25T07:37:25+5:30

Shaktipeeth Expressway update: २०,७८७कोटी रुपयांची तरतूद, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; १८ तासांच्या प्रवासाचे अंतर ८ तासांवर येणार.

Shaktipeeth highway will be built; 'No highway in Kolhapur', stand of Kolhapur ministers | शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका

शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध असतानाही महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गासाठी २० हजार ७८७ कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे १८ तासांच्या प्रवासाचे अंतर ८ तासांवर येणार आहे.

यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर यांनी शक्तिपीठला कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचा विरोध असल्याचा मुद्दा मांडला. 

शक्तिपीठला समांतर मार्ग जिल्ह्यात असल्याने हा महामार्ग कोल्हापुरात नको, अशी भूमिका मुश्रीफ व आबिटकर यांनी घेतल्याचे समजते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याबाबत पर्यायी मार्गाचा विचार होणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे.

गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी सरकारने महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला स्थगिती दिली होती. मात्र, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार येताच सरकारने हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत यासाठी तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील १२ जिल्ह्यांना जोडणारा असा आहे मार्ग

हा द्रुतगती मार्ग ८०२.५९२ किलोमीटर लांबीचा असून तो राज्याच्या पूर्वेकडील पवनार (जि. वर्धा) येथून ते पश्चिमेकडील पत्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र-गोवा सीमेला जोडणार आहे. 

हा महामार्ग राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांना जोडणार आहे. पुढे तो कोकण द्रुतगती महामार्गास गोवा-महाराष्ट्र सीमेवर जोडला जाणार आहे.

९,३८५ हेक्टर जमिनीचे भूसंपादन या प्रकल्पासाठी एमएसआरडीसीला करावे लागणार आहे. २६५ हेक्टर वनजमिनीचा समावेश आहे. सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील ३७७१ हेक्टर जमीन प्रकल्पासाठी लागेल.

या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी हुडकोकडून १२ हजार कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. या निधीतून सुमारे ७हजार ५०० हेक्टरचे भूसंपादन करण्यात येणार आहे. 

हा संपूर्ण प्रकल्प महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणार असून हा महामार्ग महाराष्ट्रातील शक्तिपीठांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न आहे.

धार्मिक स्थळे जोडली जाणार

या महामार्गामुळे राज्यातील प्रमुख शक्तिपीठे माहूर, तुळजापूर व कोल्हापूर तसेच अंबेजोगाई ही तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत.

त्याचबरोबर संतांची कर्मभूमी असलेले मराठीचे आद्यकवी अंबेजोगाईस्थित मुकुंदराज स्वामी, जोगाई देवी तसेच १२ ज्योर्तिलिंगापैकी २ औंढानागनाथ व परळी वैजनाथ, महाराष्ट्राचे आराध्य पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, यासह कारंजा-लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाचीवाडी, औदुंबर ही दत्तगुरूंची धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत.

Web Title: Shaktipeeth highway will be built; 'No highway in Kolhapur', stand of Kolhapur ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.