Join us  

शहीद पोलिसांचे आता शाळा, कॉलेजमध्ये स्मारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 5:53 AM

कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करलेल्या पोलीस अधिकारी, अंमलदारांनी जेथे शिक्षण घेतले आहे, त्या शाळा, महाविद्यालयात त्यांचे कायमस्वरुपी छायचित्र किंवा स्मारक उभारुन त्यांचा मरणोत्तर सन्मान केला जाईल.

- जमीर काझी मुंबई: कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करलेल्या पोलीस अधिकारी, अंमलदारांनी जेथे शिक्षण घेतले आहे, त्या शाळा, महाविद्यालयात त्यांचे कायमस्वरुपी छायचित्र किंवा स्मारक उभारुन त्यांचा मरणोत्तर सन्मान केला जाईल. केंद्रीय गृह विभागाच्या या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करण्यात येईल. त्यासाठी पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व आयुक्त, जिल्हा अधीक्षकांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय’हे ब्रिद घेवून कार्यरत पोलीस अधिकारी, अंमलदारांना वर्षातील १२ महिने तैनात राहावे लागते. समाजातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, तसेच समाजकंटकांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांना अनेकदा जिवावर उदार होवून काम करावे लागते. अशा घटनांमध्ये काहीवेळा त्यांना प्राण गमवावे लागतात. २१ आॅक्टोबरला राष्ट्रीय स्तरावर हौतात्म दिन साजरा करून वर्षभरात कर्तव्य बजावताना मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. आता अशा शूरवीरांच्या कामगिरीची स्मृती दीर्घकाळ लक्षात रहावी, यासाठी ते ज्या शाळा, कॉलेजमध्ये ते शिकले त्या ठिकाणी दर्शनी भागात त्यांचे स्मारक किंवा छायाचित्र लावले जाईल. त्याखाली त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती लिहिली जाईल. जेणेकरुन विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची माहिती मिळेल. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व कर्तव्याची भावना बळकट होईल. याबाबतची सूचना केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांना केली आहे.केंद्राच्या सूचनेनुसार पोलीस महासंचालकांनी यासंदर्भात सर्व घटक प्रमुखांना कार्यवाही करण्याची सूचना केली आहे. याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल केंद्र सरकारला त्वरित पाठवावयाचा आहे.ही तर अभिमानाची बाबजिवावर उदार होऊन कर्तव्य बजावित असताना शहीद झालेल्या अधिकारी, अंमलदारांच्या कार्याची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना बळकट व्हावी यासाठी हा निर्णय घेतला आहे. संबंधित शाळा, महाविद्यालयासाठी ही अभिमानाची बाब असेल. याची कार्यवाही त्वरित करण्याची सूचना सर्व अधिकाºयांना केली आहे, असे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी सांगितले.