Join us  

मुंबईतील सेवासमाप्त शिक्षणसेवकांना दिलासा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 2:01 AM

संचमान्यतेमध्ये अतिरिक्त ठरलेल्या व सेवासमाप्त केलेल्या शिक्षणसेवकांची प्रतीक्षा यादी लवकरच तयार केली जाणार आहे. त्यामुळे संबंधित शिक्षणसेवकांना पुन्हा सेवेत सामावून घेतले जाणार असून

मुंबई : संचमान्यतेमध्ये अतिरिक्त ठरलेल्या व सेवासमाप्त केलेल्या शिक्षणसेवकांची प्रतीक्षा यादी लवकरच तयार केली जाणार आहे. त्यामुळे संबंधित शिक्षणसेवकांना पुन्हा सेवेत सामावून घेतले जाणार असून, हा मोठा दिलासा मानला जात आहे.याआधी २०१३-१४ व २०१४-१५ या शैक्षणिक वर्षांमधील संचमान्यतेत बहुतेक शिक्षणसेवक अतिरिक्त ठरले होते. त्यामुळे संबंधित शिक्षणसेवकांची सेवा समाप्त झाली होती. मात्र अशा शिक्षणसेवकांची नावे तातडीने शिक्षण विभागाकडे देण्याचे आदेश शिक्षण निरीक्षकांनी मुख्याध्यापकांना दिल्याने शिक्षणसेवकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दरम्यान, अतिरिक्त शिक्षणसेवकांना तातडीने सेवेत रुजू करण्याची मागणी गेल्या आठवड्यात शिक्षक परिषदेचे मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली होती. तावडे यांच्या भेटीत संघटनेचे कार्यवाह सुभाष अंभोरे व उपाध्यक्ष बयाजी घेरडे उपस्थित होते.शिक्षणसेवकांची तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना नियमित सेवेत सामावून घेऊन नियमित वेतनश्रेणी देण्यात येते. मात्र शिक्षणसेवक कालावधी पूर्ण होण्याच्या आधी जर शाळेतील विद्यार्थी संख्या कमी झाली, तर त्याचा फटका शिक्षणसेवकाला बसून त्याची सेवा समाप्त केली जाते. याबाबत शिक्षक परिषदेने शिक्षण विभागाकडे अतिरिक्त शिक्षणसेवकांना रिक्त जागी सामावून घेण्याबाबत पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याची दखल घेत शासनाने शासन निर्णय निर्गमित करून अशा शिक्षणसेवकांना भविष्यात शाळांमध्ये होणाºया रिक्त जागांवर सामावून घेण्याबाबत निर्णय घेतला आहे. याबाबत आता शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही करून शिक्षणसेवकांना रिक्त पदांवर सामावून घेण्याचे आवाहन शिक्षक परिषदेने केले आहे.