मुंबई : जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत चिंता व्यक्त होत असल्याने गुरुवारी शेअर बाजार धडाधड कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 350 अंकांनी कोसळून 26 हजार अंकांच्या खाली आला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा सीएनएक्स निफ्टी 116 अंकांनी घसरून 7,800 अंकांच्या खाली आला.
सेन्सेक्स दोन महिन्यांत प्रथमच 26 हजार अंकांच्या खाली आला आहे. आशियाई बाजारात कमजोर कल दिसून आला. युरोपीय बाजारही खालच्या पातळीवरच दिसत होते. जाणकारांनी सांगितले की, जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाल्यामुळे शेअर बाजारातील धारणोवर विपरीत परिणाम झाला आहे. रुपयातही घसरण झाली आहे. 1 डॉलरची किंमत 61.7 रुपये झाली आहे. त्याचाही परिणाम बाजारांवर झाला. शेअर बाजारातील सर्व 12 वर्गातील कंपन्यांचे शेअर्स कोसळले.
मुंबई शेअर बाजाराचा 30 कंपन्यांच्या शेअर्सवर आधारित सेन्सेक्स 349.99 अंकांनी म्हणजेच 1.33 टक्क्यांनी कोसळून 25,999.34 अंकांवर बंद झाला. 13 ऑगस्टनंतरची ही नीचांकी पातळी आहे. सकाळी कमजोरीने उघडलेला सेन्सेक्स नंतर वाढला होता. एका क्षणी तो 26,462.08 अंकांर्पयत वर गेला होता. तथापि, ही वाढ त्याला टिकविता आली नाही. नंतर तो धडधडत खाली आला.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी 115.80 अंकांनी म्हणजेच 1.47 टक्क्यांनी कोसळून 7,748.20 अंकांवर बंद झाला. निफ्टीचाही हा दोन महिन्यांचा नीचांक ठरला आहे. दिवसभर तो 7,729.65 ते 7,893.90 अंकांच्या मध्ये खाली-वर होत होता.
मुंबई शेअर बाजारातील 2,100 कंपन्यांचे समभाग कोसळले. केवळ 750 कंपन्यांचे समभागच वाढू शकले.
शेअर ब्रोकरांनी सांगितले की, भारतीय शेअर बाजारांसाठी आजचा गुरुवार हा घातवार ठरला. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही बाजार दोन-दोन महिन्यांच्या नीचांकावर आले आहेत. गेले काही दिवस सुरू असलेल्या तेजीचा यामुळे मोठा ब्रेक लागला आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या निकालावरच आता बाजाराचे भविष्य ठरेल.
सेन्सेक्समधील 30 पैकी 26 कंपन्या नुकसानीत राहिल्या. केवळ आयटीसी, कोल इंडिया, गेल आणि सिप्ला या चारच कंपन्या लाभात राहिल्या. सेन्सेक्समधील हिंडाल्कोला सर्वाधिक 5.46 टक्के घसरणीचा फटका बसला. त्याखालोखाल एमअँडएम, एसएसएलटी, टाटा स्टील, टाटा पॉवर, रिलायन्स इंडस्ट्रीज, भेल, भारती एअरटेल, एचडीएफसी, हीरो मोटोकॉर्प, एसबीआय आणि बजाज ऑटो या ब्ल्यूचिप कंपन्यांना फटका बसला. एनटीपीसी, एचडीएफसी बँक, विप्रो, इन्फोसिस, एलअँडटी आणि ओएनजीसी या कंपन्यांचे समभागही नुकसानीतच राहिले.
4जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती मोठय़ा प्रमाणात कमी झाल्या आहेत. युरोपातील बेंच मार्क असलेला ब्रेंट नॉर्थ सी क्रूड 1.22 डॉलरनी कोसळून प्रतिबॅरल 83.78 डॉलर झाला. कच्च्या तेलातील घसरण शेअर बाजारातील घसरणीला कारणीभूत ठरली.
4आशियाई बाजारांत नरमाईचा कल दिसून आला. हाँगकाँग, सिंगापूर, जपान, दक्षिण कोरिया, चीन आणि तैवान येथील बाजार 0.25 ते 2.72 अंकांनी कोसळले. युरोपातील बाजार सकाळी खाली चालले होते.