Join us  

सिनेट निवडणुकांचा मुहूर्त आता हिवाळी अधिवेशनानंतरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 5:59 AM

मुंबई विद्यापीठाने निकालाची डेडलाइन चुकवलीच. पण, त्यापाठोपाठ आता विद्यापीठ सिनेट निवडणुकांची डेडलाइन चुकवणार असल्यामुळे विद्यार्थी संघटना संतप्त झाल्या आहेत.

मुंबई : मुंबई विद्यापीठाने निकालाची डेडलाइन चुकवलीच. पण, त्यापाठोपाठ आता विद्यापीठ सिनेट निवडणुकांची डेडलाइन चुकवणार असल्यामुळे विद्यार्थी संघटना संतप्त झाल्या आहेत. ३० नोव्हेंबरआधी सिनेट निवडणुका होणे अपेक्षित आहे. पण, सध्या ज्या गतीने काम सुरू आहे, त्यावरून हिवाळी अधिवेशनानंतरच सिनेट निवडणुका होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.निकाल प्रक्रियेत व्यस्त असलेल्या विद्यापीठाच्या अन्य कामांवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात लागू केलेल्या नवीन विद्यापीठ कायद्यानुसार, राज्यातील विद्यापीठांना सिनेट निवडणुका नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करायच्या आहेत. पण, विद्यापीठाला ही मुदत पाळता येणार नसल्याने आता विद्यापीठ उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे मुदतीसाठी पत्रव्यवहार करणार आहे. आॅगस्ट महिन्यात सिनेट निवडणुकांच्या प्रक्रियेला वेग आला होता. पण, त्यानंतर निकालाचा ताण वाढल्याने निवडणुकांचे काम मागे पडत गेले.११ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशनाची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. त्याचाही फटका काही प्रमाणात सिनेट निवडणुकांना बसणार आहे. काही अधिकारी हे अधिवेशनाच्या कामात व्यस्त असल्यामुळे सिनेट निवडणुकांना उशीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा फटका निवडणुकांना बसल्यास नवीन वर्षात निवडणुकांचा मुहूर्त निघेल असा अंदाज अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.३० आॅक्टोबर रोजी सिनेटसह अन्य प्राधिकरणे बरखास्त झाली आहेत. या कामकाजासाठी अन्य समिती नेमण्यात आली आहे. पण, विद्यार्थी संघटनांचे लक्ष हे सिनेट निवडणुकांकडे लागून राहिले आहे. अंतिम यादी आणि मसुदा तयार झाल्यावरच निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. पण, या प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्या असल्या तरी डेडलाइनचे काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ