Join us  

आधी ‘चालवून’ पहा, मग विश्वास ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 1:24 AM

स्वमालकीच्या शिवशाहींचे ब्रेक डाउन वाढले

मुंबई : एसटी महामंडळाच्या भाडेतत्त्वावरील ‘शिवशाही’ खासगी चालकांच्या अरेरावीमुळे चर्चेत आहे. आता यात कंत्राटदारांचाही समावेश झाला आहे. एसटीच्या स्वमालकीच्या शिवशाहीचे ब्रेकडाउनचे दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, एसटी ताफ्यात शिवशाही दाखल करताना ५० किमी ‘प्री-डिलिव्हरी’ ट्रायल घ्या, असा मुख्यालयाने विभाग नियंत्रकांना आदेश दिला आहे. त्यामुळे नव्याने दाखल होणाऱ्या शिवशाहीबाबत ‘आधी चालवून पहा, मग विश्वास ठेवा’ हा कानमंत्र एसटी मुख्यालयाने विभागांना दिला आहे.वातानुकूलित-अत्याधुनिक ‘शिवशाही’ हा परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. प्रवासी मिळविण्यासाठी पारंपरिक एशियाड बसच्या मार्गावर या शिवशाही राज्यभर धावत आहेत. पहिल्या टप्प्याअखेर १ हजार १६० बस असून, यात स्वमालकीच्या ५०० शिवशाही आहेत. मात्र मार्गावर शिवशाही ब्रेकडाउन घटनांमध्ये वाढ होत असून प्रवाशांना त्रास होत आहे. महामंडळाची एसटी ब्रेकडाउन झाल्यास, जवळच्या आगारातून त्वरित अन्य एसटीची सोय करण्यात येते. मात्र, वातानुकूलितचे दर आकारून साध्या एसटीने प्रवास करण्यास प्रवासी तयार होत नाहीत. यामुळे वादाचे प्रसंग उद्भवतात.भाडेतत्त्वावरील शिवशाहीपेक्षा स्वमालकीच्या शिवशाहीच्या ब्रेकडाउनचे प्रमाण जास्त असल्याचे महामंडळाने मान्य केले आहे. हे प्रकार टाळण्यासाठी मुख्यालयाने नाशिक, नागपूर, पुणे, धुळे, अमरावतीसह अन्य विभागांना ५० कि.मी. प्री-डिलिव्हरी ट्रायल घेण्याचे आदेश पत्राद्वारे दिले.महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील २ हजार वातानुकूलित शिवशाही दाखल होणार आहेत. मात्र, स्वमालकीच्या शिवशाही काही महिन्यांतच मोठ्या प्रमाणात ब्रेकडाउन होत असल्याने, महामंडळ संबंधित कंपनी, कंत्राटदारांवर काय कारवाई करेल? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.भाडेतत्त्वावरील ‘शिवशाही’ अस्वच्छमहामंडळाने नागपूर-चंद्रपूर या मार्गावर भाडेतत्त्वावरील शिवशाही सुरू केली. मात्र, या शिवशाहीच्या अस्वच्छतेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. बस क्रमांक एमएच-२९-बीई-०९७३ या शिवशाहीच्या २.३७ मिनिटांच्या या व्हिडीओत सर्व आसनांखाली घाण आणि कचरा पसरल्याचे दिसत आहे. यामुळे खासगी शिवशाहीमध्ये स्वच्छता राखण्याची जबाबदारी नक्की कोणाची? असा प्रश्न प्रवाशी उपस्थित करीत आहेत.

टॅग्स :बसचालकशिवशाही