Join us  

राज्यात दुसऱ्या लाटेत तरुणांमध्ये श्वसनाचा त्रास वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग दिवसागणिक वाढत आहे. ज्येष्ठ नागरिकांप्रमाणेच तरुणांमध्येही बाधित होण्याचे प्रमाण वाढले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग दिवसागणिक वाढत आहे. ज्येष्ठ नागरिकांप्रमाणेच तरुणांमध्येही बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षातील संक्रमण काळाच्या तुलनेत रुग्णालयात दाखल होणाऱ्यांमधून ऑक्सिजनची मागणीही वाढल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. त्याचप्रमाणे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांमध्ये श्वसनाचा त्रास होण्याचे प्रमाणही चिंताजनक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सेंटर इंटिग्रेटेड डिसिज सर्व्हायलन्स प्रोगामच्या माहितीनुसार, मागील वर्षी ३१ टक्के तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, तर यंदाच्या लाटेत हे प्रमाण ३२ टक्क्यांवर आले आहे. नवजात बालक ते ३९ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींचे पहिल्या लाटेच्या तुलनेतील बाधित होण्याचे प्रमाण काहीसे वाढले आहे. नवजात बालक ते १९ वर्षांपर्यंतचे ५.८ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. पहिल्या लाटेत हे प्रमाण ४.२ टक्के इतके होते, तर २० ते ३९ वयोगटातील २५.५ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत, पहिल्या लाटेत हे प्रमाण २३.७ टक्के होते.

कोरोनाच्या दोन्ही लाटेत ज्येष्ठ नागरिकांचे बाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे, तर रुग्णालयात दाखल होणाऱ्यांमधील ७० टक्के प्रमाण हे ४० हून अधिक वयोगटातील व्यक्तींचे आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लक्षणविरहित असणारे मात्र श्वसनाचा त्रास असलेले अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात मिळून १ हजार ८८५ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला, तर सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये ७ हजार ६०० रुग्णांचा बळी गेला होता.

* दुसऱ्या लाटेत ४७.५ टक्के रुग्णांना श्वसनाचा त्रास

इंडियन काैन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अहवालानुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल झालेल्या ४७.५ टक्के रुग्णांना श्वसनाचा त्रास झाल्याचे निदर्शनास आले आहे. पहिल्या लाटेत हे प्रमाण ४१.७ टक्के इतके होते. यामुळे दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी वाढल्याचेही सातत्याने दिसून येत आहे.

* व्हेंटिलेटरसह ऑक्सिजनची गरजही वाढली

देशभरातील ४० केंद्रांकडून गोळा केलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पहिल्या लाटेत ४१.१ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली होती. आताच्या लाटेत ही गरज ५४.५ टक्के झाल्याचे दिसून आले आहे, तर दुसरीकडे रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांची व्हेंटिलेटरची गरजही वाढली आहे. मागील लाटेत व्हेंटिलेटरची गरज भासलेल्या रुग्णांचे प्रमाण २७.८ टक्के होते. सद्य:स्थितीत हे प्रमाण ३७.३ टक्क्यांवर आले आहे.

ऑक्सिजनच्या गरजेचे प्रमाण

संसर्गबाधित पहिली लाटदुसरी लाट

३० वर्षांखालील ३१ टक्के ३२ टक्के

३०-४० २१ टक्के २१ टक्के

संसर्गाची तीव्रता पहिली लाटदुसरी लाट

श्वसनाचा त्रास ४१.७ टक्के ४७.५ टक्के

ऑक्सिजनची गरज ४१.१ टक्के ५४.५ टक्के

....................................