Join us  

स्कुबा डायव्हिंग सेंटर उद्यापासून खुले

By admin | Published: October 13, 2015 11:06 PM

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश : उद्घाटनाची प्रतीक्षा कायम

मालवण : तारकर्ली देवबागच्या सीमेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहुचर्चित स्कुबा डायव्हिंग सेंटर नामांतरवादात अडकल्याने महत्त्वाकांक्षी वास्तू उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: याची गंभीर दखल घेतली. त्यांच्या आदेशानंतरच पर्यटन महामंडळाने हे सेंटर पर्यटकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सेंटरचा उद्घाटन सोहळा मागाहून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवार (दि.१५ आॅक्टोबर) पासून पर्यटकांसाठी खुले होणार आहे. त्यामुळे सेंटरचे उद्घाटन अजूनही काहीकाळ लांबण्याची शक्यता आहे. मालवणचे स्कुबा डायव्हिंग सेंटर इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ स्कुबा डायव्हिंग क्बाटिक स्पोर्ट (इसदा) या नावाने नोंदणीकृत करण्यात आले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन उद्योगात त्याचा फायदा मिळणार आहे. येथे भविष्यात समुद्र संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार असून महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांच्या अग्निशामक दलांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण येथे दिले जाणार आहे. तसेच वनखात्यासाठीही सागरी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था येथे करण्यात येणार आहे. त्यामुळे मालवणचे स्कुबा डायव्हिंग सेंटर खऱ्या अर्थाने पर्यटन प्रसारात मार्गदर्शक ठरणार आहे. (प्रतिनिधी)स्थानिकांना अल्प दरात प्रशिक्षण स्नॉर्कलिंग व स्कुबा डायव्हिंगच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणासाठी जवळपास ४ ते ५ लाख खर्च येतो; परंतु येथील स्थानिक तरुणांना हा खर्च परवडणारा नसल्याने स्कील इंडियाच्या माध्यमातून केवळ १० ते १५ हजारांत हे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा केंद्राचा मानस आहे. तसेच इतर मागास प्रवर्गासाठी असलेल्या शासकीय योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घेण्याचेही येथे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. दीड वर्षांपूर्वीच वास्तू पूर्णसागर संशोधक डॉ. सारंग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तारकर्ली-देवबाग हद्दीवरील ओसाड जागेवर सुमारे दहा कोटी रुपये खर्चून ही प्रशस्त व दिमाखदार वास्तू उभी राहिली आहे. सन २००६ मध्ये पर्यटन महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी या केंद्राला मंजुरी दिली होती. सुमारे दीड वर्षांपूर्वीच ही वास्तू पूर्ण होऊन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.