Join us  

विज्ञान प्रसारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:09 AM

शशिकुमार चित्रे आपले पूर्ण आयुष्य संशोधन, अध्यापन आणि विज्ञान प्रसारासाठी पणाला लावून गेले हीच त्यांची स्मृती आमच्या मनात कायमची ...

शशिकुमार चित्रे आपले पूर्ण आयुष्य संशोधन, अध्यापन आणि विज्ञान प्रसारासाठी पणाला लावून गेले हीच त्यांची स्मृती आमच्या मनात कायमची राहणार आहे. अलीकडेच त्यांचे निधन झाले. त्यांना वाहिलेली श्रद्धांजली.

..............................

भारताच्या खगोल भौतिकीशास्त्रातील सूर्य-चंद्र म्हणजे जयंतराव नारळीकर आणि शशिकुमार चित्रे. शशिकुमार चित्रे आणि नारळीकर १९५७ साली बोटीने इंग्लंडला गेले. दोघेही तेथे गणितातील ट्रायपोसची परीक्षा देऊन रँग्लर झाले. नंतर दोघांनीही खगोल भौतिकीत पीएच.डी. केली. ते २०२०चे नोबेल पुरस्कार विजेते रॉजर पेनरोज आणि स्टिफन हॉकिंग यांचे समकालीन होते. नारळीकर आणि चित्रे असे दोघेही काही वर्षे तेथे राहिले आणि भारतात येऊन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये प्राध्यापक म्हणून संशोधन करू लागले. शशिकुमार चित्रे १९६७ ते २००१ अशी ३४ वर्षे तेथे होते.

शशिकुमार चित्रे यांचे संशोधनाचे विषय सौर भौतिकी, खगोल भौतिकी, सूर्याचे चुंबकीय क्षेत्र, गुरुत्त्वीय भिंग, सौर डाग, सौर प्रभामंडळ आणि सौर वातावरण असे होते. पृथ्वीपासून १४.७१ कोटी किलोमीटर दूर असलेल्या सूर्याच्या प्रभामंडलात घडणारे बदल, सौर डागांचा पृथ्वीवर होणारा परिणाम यांवर त्यांनी काम केले. चुंबक व जलगतिकी यावरील इंग्लिश शास्त्रज्ञ जी. कोलिंग यांच्याबरोबर त्यांनी काम केले. त्यांनी न्यूट्रॉन ताऱ्यांवर केलेले काम अणुशास्त्रज्ञ विल्यम ए. फाउलर व सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ कीप थॉर्न यांच्याबरोबर कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅलटेक) येथील आहे. भारतात आल्यावर त्यांनी सौर चुंबकीय चक्र, सौर वातावरणातील उदासीन कण, सौर डायनामो सिद्धांत व आयन सौर डागांचे रंग यावर काम केले.

टाटा इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन चालू असताना शशिकुमार चित्रे दरवर्षी परदेशी जाऊन काही संशोधन करीत व तेथील विद्यापीठातून व्याख्याने देत. यात प्रिन्स्टन, केम्ब्रिज, ससेक्स, ॲमस्टरडॅम, कोलंबिया, व्हर्जिनिया, इत्यादी विद्यापीठे होती. ते म्युनिचच्या मॅक्स प्लांक इन्स्टिट्यूटचे फेलो होते. ते नॅशनल ॲकेडेमी ऑफ सायन्सेस, ‘नासा’चे वरिष्ठ संशोधक होते. लंडन विद्यापीठाच्या क्वीन मेरी आणि वेस्टफिल्ड कॉलेजांचे फेलो आणि अभ्यागत प्राध्यापक होते. केम्ब्रिजच्या इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉनॉमीचे ते अभ्यागत खगोल अभ्यासक होते.

शशिकुमार चित्रे भारतातील अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचे फेलो आणि अभ्यागत प्राध्यापक होते; तसेच ते मुंबई विद्यापीठाचे राजा राममोहन रॉय फेलो होते. भारतातील ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते अध्यक्ष होते. अशा खगोलशास्त्रातील अनेक संस्थांशी ते जोडले गेले होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ त्या त्या संस्थांना वेळोवेळी झाला आहे.

भारतातील भाभा अणुसंशोधन केंद्र आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमधून निवृत्त होणाऱ्या संशोधकांच्या ज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा या उद्देशाने २००० साली अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी मुंबई विद्यापीठाशी बोलणी करून विद्यापीठात एक नवीन विभाग सुरू करून घेतला. त्याचे नाव ‘सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस’. या विभागाची सगळी जबाबदारी शशिकुमार चित्रे यांनी ८४व्या वर्षीही म्हणजे आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत सांभाळली.

शशिकुमार चित्रे यांना विज्ञान प्रसाराची आवड होती. ते नेहरू तारांगण, नेहरू विज्ञान केंद्र, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र या संस्थांचे मार्गदर्शक होते.

शशिकुमार चित्रे वरळीच्या नेहरू तारांगणाच्या स्थापनेपूर्वीपासून या केंद्राचे सल्लागार होते. हे केंद्र एकेकाळचे काॅँग्रेस पक्षाचे खजिनदार असलेले बॅ. रजनी पटेल यांच्या पुढाकाराने स्थापन झाले आहे. या केंद्राचे उद्घाटन १९७८ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते व्हावयाचे होते आणि स्वागताचे भाषण शशिकुमार चित्रे यांनी करावे असे बॅ. रजनी पटेल यांनी त्यांना सुचवले होते. प्रत्यक्ष भाषण देण्यापूर्वी काही दिवस अगोदर रजनी पटेल शशिकुमार चित्रे यांना म्हणाले, तुम्ही काय बोलणार आहात ते माझ्यापुढे बोलून दाखवा. चित्रे यांनी त्यांच्यापुढे आपले भाषण केल्यावर रजनी पटेल त्यांना म्हणाले, हे फारच रुक्ष झाले. तुमच्या बोलण्यात आवाजाचे चढउतार नाहीत आणि चेहऱ्यावरही काही हावभाव नाहीत. थांबा, मी असे करतो की सिनेमा नट दिलीपकुमार यांची ट्यूशन तुम्हाला देतो आणि तसे केल्यावर मग चित्रे यांनी इंदिरा गांधींच्या उपस्थितीत दिलेले भाषण या सर्वदृष्ट्या फारच प्रभावी झाले आणि तेथून पुढची चित्रे यांची विज्ञान विषयावरची भाषणेही ऐकत राहावीत अशीच होत असत.

शशिकुमार चित्रे यांचा मोबाईल फोन एकमार्गी होता. म्हणजे आपण त्यांना मोबाईलवर केलेला फोन ते घेत नसत; कारण तो बंद ठेवलेला असे. मात्र त्यांना जेव्हा तो करायचा असेल तेव्हा तो ते चालू करून वापरत. ते कुठेही बाहेर गेले की तेथून परतण्यापूर्वी ‘सुवर्णा, मी आता इथून निघतोय’ असा फोन ते घरी करीत.

सन २००० सालाच्या सुमारास मी एकदा लोकमान्य सेवा संघात विज्ञान व्याख्यानमाला केली होती. त्यात जलतज्ज्ञ माधवराव चितळे, शेतीतज्ज्ञ जयंतराव पाटील, शशिकुमार चित्रे इत्यादींची भाषणे आयोजित केली होती. मला या व्याख्यानमालेसाठी अनुदान मिळाले होते, म्हणून मी प्रत्येक वक्त्याला ३-३ हजार रुपये मानधन दिले; तर जाताना शशिकुमार चित्रे मला म्हणाले, तुम्ही आम्हाला लाडावून ठेवू नका. एवढे मानधन देतात काय? शशिकुमार चित्रे हे मराठी विज्ञान परिषदेचे सन्माननीय सभासद होते आणि परिषदेने ज्या ज्या वेळी त्यांना बोलावले, त्या त्या वेळी ते परिषदेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

- अ. पां. देशपांडे