पहिला दिवस : पाचवी ते आठवीचे सरासरी ३० टक्के विद्यार्थी हजर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काेराेना संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात आल्यानंतर तब्बल १० महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर २७ जानेवारीपासून मुंबई महापालिका वगळता राज्यातील ५ वी ते ८ वीच्या शाळा सुरू झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी राज्यातील ८५ टक्के शाळा सुरू झाल्या. पहिल्याच दिवशी या शाळांमध्ये सरासरी ३० टक्के विद्यार्थी हजर राहिले.
राज्यातील ३६ जिल्ह्यांत मिळून पाचवी ते आठवीच्या एकूण ३३,४८७ शाळा आहेत. यामधील विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३२ लाख ४५ हजार ५१२ इतकी आहे. तर १ लाख ४५ हजार ६७ शिक्षक आणि २८ हजार ८७ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. पहिल्या दिवशीच्या प्राप्त जिल्ह्यांच्या माहितीनुसार वाशीम, यवतमाळ, नाशिक, जालना, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, सातारा या जिल्ह्यांत ९० टक्क्यांहून अधिक शाळा सुरू झाल्या आहेत.
गोंदिया जिल्ह्यात विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक म्हणजे ५२ टक्के हाेते. इतर जिल्ह्यांत विद्यार्थ्यांची उपस्थिती जेमतेम ३० ते ४० टक्क्यांच्या दरम्यान हाेती. नागपूर जिल्ह्यात ६४ टक्के शाळा सुरू होऊनही विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण केवळ ८ टक्के असल्याचे दिसून आले. हळूहळू हे प्रमाण वाढेल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे वगळता बीड, बिळधान, जळगाव, हिंगोली, कोल्हापूर, लातूर, नंदुरबार, रायगड, रत्नागिरी, सांगली अशा बऱ्याच जिल्ह्यांची पहिल्या दिवशीची माहिती एससीईआरटीला बुधवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मिळाली नव्हती. अन्यथा राज्यातील शाळा सुरू होण्याचा टक्का वाढला असता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
* मुंबईतील शाळा सुरू करण्यावरून दुमत
ऑनलाइन शिक्षण हे शिक्षणाला उपयुक्त पर्याय ठरत नसल्याने लवकरात लवकर मुंबईतील शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी पालक आणि शिक्षकांच्या एका समूहाकडून होत आहे. तर दुसरीकडे प्रवासासाठी रेल्वे सेवा उपलब्ध होत नाही, शाळांना निर्जंतुकीकरणासाठी साहित्य उपलब्ध होत नाही तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी घेतली जात नाहो तोपर्यंत शाळा नकोच, असे मत पालक व शिक्षकांच्या दुसऱ्या समूहाकडून व्यक्त होत आहे.