Join us  

म्हणींच्या गोष्टी – शब्दावरून आणि अर्थावरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:07 AM

लहान मुलांना गोष्टी सांगत सांगत झोपविण्याची पद्धत जगभर आहे. आपल्याकडे रामायण-महाभारत-वेताळ-इसाप-तेनालीराम वगैरेंच्या कथा वेगवेगळ्या प्रांतात सांगितल्या जातात. परदेशात त्यांच्या ...

लहान मुलांना गोष्टी सांगत सांगत झोपविण्याची पद्धत जगभर आहे. आपल्याकडे रामायण-महाभारत-वेताळ-इसाप-तेनालीराम वगैरेंच्या कथा वेगवेगळ्या प्रांतात सांगितल्या जातात. परदेशात त्यांच्या त्यांच्या ज्या काही पौराणिक कथा असतील, त्या सांगितल्या जात असतील; पण कथा सांगून मुलांना झोपविणे हे समान सूत्र सगळीकडे आहे.

संगणक क्षेत्रात काम करणाऱ्या अचिंत्य बाक्रे यांनीही आपली मुले लहान असताना त्यांना झोपविण्यासाठी कथाच सांगितल्या; पण मौज अशी की, त्या गोष्टी पारंपरिक न सांगता त्यांनी स्वत: त्या रचून सांगितल्या. वस्तुत: अचिंत्य बाक्रे हे काही मराठीचे प्राध्यापक अथवा साहित्यिक नाहीत की त्यांनी कथा रचणे स्वाभाविक आहे आणि ज्या कथा त्यांनी आपल्या मुलांना सांगितल्या त्या मराठीत प्रचलित असणाऱ्या म्हणींवर आधारित आहेत. पन्नास वर्षांपूर्वीच्या लोकांच्या बोलण्यात, विशेषत: महिलांच्या बोलण्यात उठता-बसता म्हणींचा वापर होत असे. इंग्रजी माध्यमातून शिकणारी मुले, भले घरी आई-वडील मराठीत बोलत असल्याने मराठी बोलायला शिकत असतील व कामचलाऊ मराठी बोलत असतील, पण ती मुले मराठी संस्कृतीत असणाऱ्या म्हणींच्या या मोठ्या खजिन्याला मुकणार आहेत. त्यामुळे अचिंत्य बाक्रे यांनी मनोविकास प्रकाशनाच्या माध्यमातून छापलेल्या तीन पुस्तिकांमार्फत २५ म्हणींवर आधारित ज्या गोष्टी लिहिल्या आहेत, ते तर कौतुकास्पद आहेच, पण आता त्यांची मुले गोष्टी सांगून झोपविण्यापलीकडे गेली असली तरी अजून अनेक म्हणींवर कथा लिहाव्यात. मराठी म्हणींचा कोश बनवला गेला आहे, पण तो सहजी वाचला जात नाही, पण त्यावर आधारित गोष्टी मात्र लोक वाचत असल्याने त्या म्हणी जिवंत ठेवण्याचे पुण्यकर्मही त्यांच्या हातून घडेल.

आयजीच्या जीवावर बायजी, आधी पोटोबा, मग विठोबा, चोराच्या मनात चांदणे, डोंगर पोखरून उंदीर काढला, आयत्या बिळावर नागोबा, सुंठीवाचून खोकला गेला या त्यापैकी वानगीदाखल काही म्हणी. शहरातील धुळीमुळे खोकला झालेल्या एका मुलाला त्याची आई रोज सुंठीचा काढा प्यायला द्यायची, पण त्याचा काही उपयोग होत नसे, पण त्याच्या एका नातेवाइकाच्या बोलावण्यावरून तो त्यांच्या खेडेगावात जाऊन राहिला. तेथील स्वच्छ हवा आणि पोहण्याच्या व्यायामामुळे सुंठीचा काढा न घेताच त्याचा खोकला गेला. ही त्यांची गोष्ट शब्दावरून झाली. आता अर्थावरूनची गोष्ट ऐका. काही ससे रोजचे तेच ते खाऊन कंटाळले होते. मग ते दुसरीकडे गेले. तेथे गाजराचे शेत होते, पण जमीन दलदलीची होती. एकच ससा तरीही पुढे गेला आणि बाकीचे घाबरून मागे राहिले. पुढे गेलेला ससा दलदलीत आपटून माघारी आला व म्हणाला, पुढे जाता येत नाही. बाकीचे ससे म्हणाले, त्या घाण पाण्यातली गाजरे खाऊन तुझे पोट बिघडले असते. बरे झाले तू गाजरे न खाताच आलास ते. सुंठीवाचून खोकला गेला.

म्हणींच्या गोष्टी – शब्दावरून, अर्थावरून – ३ पुस्तिका

लेखक - अचिंत्य बाक्रे.

पृष्ठे प्रत्येकी ४८ आणि किंमत प्रत्येकी रु. ६०/-

प्रकाशक – मनोविकास प्रकाशन, पुणे

- अ.पां. देशपांडे