Join us  

पतंग सांभाळा, अन्थथा शहर अंधारात जाईल; वीज कंपन्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 1:44 AM

ओव्हरहेड वीज पारेषण तारांना धोका

मुंबई : ओव्हरहेड वीज पारेषण तारांजवळ पतंग उडविणे जीवासाठी धोकादायक, मालमत्तेचे नुकसान करणारे असून, यामुळे पॉवर ग्रिडला हानी पोहोचून संपूर्ण शहर काळोखात जाण्याचा धोका आहे. परिणामी केवळ मकरसंक्रांतीच्या दिवशीच नव्हे तर इतर वेळीही पारेषण तारांजवळ पतंग उडविणे प्राणघातक आहे. ओव्हरहेड वीज पारेषण तारांजवळ पतंग उडविणे टाळ, असा सल्ला वीज कंपन्यांनी मुंबईकरांना मकरसंक्रांतीच्या निमित्ताने दिला आहे.

अदानी इलेक्ट्रिसिटीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पतंग उडविण्यासाठी वापरला जाणारा मांजा हा दोरा विजेचा सुवाहक आहे. या मांजाच्या आवरणात धातूची भुकटी वापरली असेल तर तो खूपच धोकादायक होतो. या मांजाचा ओव्हरहेड वाहक तारांना स्पर्श झाला किंवा तो या तारांच्या वक्र कक्षेत जरी आला तरी तो अतिउच्च म्हणजेच २ लाख २० हजार व्होल्ट्स इतक्या विद्युतदाबाचे वहन करू शकतो. परिणामी यामुळे केवळ वीजपुरवठा खंडित होणार नाही तर गंभीर दुखापत होईल. शिवाय पारेषण तारा तुटून ग्रिड बंद होईपर्यंत गंभीर घटनाही घडू शकेल.

वर्सोवा, ओशिवरा, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली येथे उच्चदाबाच्या ओव्हरहेड पारेषण तारांचे जाळे आहे. या भागांत ओव्हरहेड वीज पारेषण तारांजवळ पतंग उडविणे टाळा. पारेषण तारांजवळ पतंग उडविल्याने काही अप्रिय घटना घडल्यास १९१२२ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन अदानीने केले आहे.काळजी घ्या :विजेच्या तारांवर अडकलेले पतंग सोडवण्याचा प्रयत्न करू नका. वीजतारांमध्ये अडकलेले पतंग काढण्यासाठी दगडाला दोर बांधून तारांवर फेकू नका.धातूमिश्रित मांजा घातक ठरू शकतो. धातूमिश्रित मांजातून वीज प्रवाहित होऊन अपघात घडतो. मांजामुळे पक्षीजखमी होणार नाहीत याची काळजी घ्या. रेल्वे रुळांवर उतरून पतंग उडवणे धोक्याचे ठरू शकते.पक्ष्यांवरची संक्रांत टाळापतंग उडविण्यासाठी धारदार मांजा वापरला जातो. या मांजामुळे चिमण्या व इतर पक्षी जखमी होतात. अनेकदा त्यांचा जीवही जातो. केवळ मकरसंक्रांती दिवशी नाही, तर नंतरदेखील वृक्षांना लटकलेल्या मांजांमध्ये पक्षी अडकून जखमी होण्याचे प्रमाण अधिक आहे. परिणामी अशा घटनांमध्ये पक्षी जखमी झाल्याचे आढळल्यास, किंवा तशी घटना निदर्शनास आल्यास ‘स्पॅरोज शेल्टर’ला कळवावी, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रमोद माने यांनी दिली.अनेक ठिकाणी उघड्या वीजवाहिन्या असल्याने पतंग उडवताना खबरदारी घेण्याचे आवाहन वीज कंपन्यांकडून केले जाते.धातूमिश्रित तसेच काचमिश्रित मांजाची चलती असते. या मांजावर रसायनाचा थर चढवण्यात येतो. या मांजाचा उघड्या वीजवाहिन्यांशी संपर्क येताच मांजातून वीज प्रवाहित होते आणि पतंग उडवणाऱ्याला विजेचा धक्का बसतो. रेल्वेच्या ओव्हरहेड तारांमधून वीज प्रवाहित होत असते. येथे पतंग उडवणाऱ्यांना विजेचा धक्का बसण्याची भीती असते. या कारणाने रेल्वे रुळांच्या परिसरात पतंग उडवू नये.नायलॉनसह चिनी मांजाबरोबरच काचेची पूड वापरून धारदार बनवलेल्या सुरती मांजाचा वापर केला जातो. या मांजावर बंदी आहे. मात्र खरेदी-विक्री सुरू असते. काही विशिष्ट प्रकारच्या मांजामुळे पतंग उडविणाºयांनाही धोका निर्माण झाला आहे.धातू किंवा काचमिश्रित मांजाचा उघड्या वीजवाहिन्यांशी संपर्क होताच पतंग उडविणाºयांना शॉक लागण्याच्या घटना घडतात.

टॅग्स :पतंग