Join us  

सांताक्लॉज आणणार थंडी; ख्रिसमसला मुंबई गारठणार

By अबोली कुलकर्णी | Published: December 03, 2020 4:16 AM

सचिन लुंगसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एव्हाना मुंबईकर थंडीने कुडकुडत असतात. दक्षिण मुंबईत तिबेटहून स्वेटर विक्रेतेही दाखल झालेले ...

सचिन लुंगसे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एव्हाना मुंबईकर थंडीने कुडकुडत असतात. दक्षिण मुंबईत तिबेटहून स्वेटर विक्रेतेही दाखल झालेले असतात. नाशिक, महाबळेश्वर, माथेरान केंव्हाचेच गारठलेले असते. मात्र यंदा नोव्हेंबरचे सुरुवातीचे काही दिवस वगळले तर हा महिना थंडीविनाच गेला. डिसेंबर उजाडला तरी मुंबईत थंडीचा पत्ता नाही. अशीच काहीशी परिस्थिती आणखी काही दिवस राहण्याची शक्यता असून, डिसेंबर महिन्याच्या शेवटी मात्र मुंबईत किमान तापमान खाली घसरल्यानंतर मुंबईकरांना थंडीची मजा घेता येईल.

यंदा पावसाने मुंबईसह राज्यात धुमाकूळ घातला. पावसाळा संपतो तोच ऑक्टोबर हिटचे चटके बसणार, असे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्षात ऑक्टोबर संपला तरी चटके काही बसले नाहीत. उलट नोव्हेंबर महिन्यात मुंबईचे कमाल तापमान खाली-वर झाले. किमान तापमानात फार काही बदल झाला नाही किंवा ते खालीदेखील घसरले नाही. डिसेंबरच्या सुरुवातीला कमाल तापमानात घट होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात अजूनही कमाल तापमानाचा पारा चढाच असून, मुंबईचे कमाल तापमान सरासरी ३४ अंशाच्या आसपास आहे.

तत्पूर्वी नोव्हेंबरच्या सुरुवातीला म्हणजे दिवाळीआधी मुंबईचे किमान तापमान १९ अंशावर घसरले आणि मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली हाेती. मात्र मुंबईकरांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. दिवाळीदरम्यान गायब झालेली थंडी आता डिसेंबरचा पहिला आठवडा उजाडला तरी परत आलेली नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, इतक्यात तापमानात घट होण्याची शक्यता कमी असून, डिसेंबर महिन्याच्या शेवटी नाताळदरम्यान मुंबईत किमान तापमानात घट होईल.

* तीन महिने किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला दोन दिवस किमान तापमान १९ अंश नोंदविण्यात आले होते. नोव्हेंबर महिन्यातील कमाल तापमानाशी तुलना करता किमान तापमान अपेक्षेप्रमाणे खाली उतरले नाही. मुंबईत मंगळवारी ३६ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदविण्यात आले. डिसेंबरच्या शेवटी मुंबईला गारवा जाणवेल. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल. हे हंगामनिहाय आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात १५ ते १६ अंशावर तापमान खाली येईल. मुंबईत डिसेंबर, जानेवारीत गारठा जाणवेल.

- कृष्णानंद होसाळीकर,

उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग

-------------------