Join us  

एसी लोकलच्या श्रेयावरून संजय निरुपम ट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 2:24 AM

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम सोशल मीडियात चांगलेच सक्रिय असतात. स्वत:ची व पक्षाची भूमिका मांडण्यासाठी टिष्ट्वटर, फेसबुक आणि व्हिडीओचा सातत्याने वापर करतात.

मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम सोशल मीडियात चांगलेच सक्रिय असतात. स्वत:ची व पक्षाची भूमिका मांडण्यासाठी टिष्ट्वटर, फेसबुक आणि व्हिडीओचा सातत्याने वापर करतात. मंगळवारी, दाखल झालेल्या एसी लोकलची संकल्पना काँग्रेसची असल्याचा दावा करतानाच, त्याचे दर कमी ठेवण्याचे आवाहन निरुपम यांनी टिष्ट्वटरद्वारे केले. श्रेय घेण्याचा हा प्रयत्न असून, संकल्पना मांडण्यासाठी नाही, तर ती प्रत्यक्षात उतरविणे महत्त्वाचे असते, अशा शब्दांत अनेकांनी निरुपम यांना फटकारले.एसी लोकलची संकल्पना काँग्रेसच्या काळात मांडण्यात आली होती. मी स्वत: हा विषय लोकसभेत उपस्थित केला होता. एसी लोकलचे भाडे सामान्य प्रवाशांना परवडणारे राहील, याची काळजी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी घ्यावी, असे टिष्ट्वट संजय निरुपम यांनी सोमवारी केले होते. या टिष्ट्वटवर उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या. श्रेय घेण्याचा नसता प्रयत्न असल्याचा दावा काही जणांनी केला, तर केवळ संकल्पना मांडायची आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी करायची नाही, या धोरणामुळे काँग्रेसला वाईट दिवस आल्याची भूमिका काहींनी मांडली. अनुराग सक्सेना या व्यक्तीने निरुपम यांच्यावर थेट निशाणा साधला. निरुपम काम न केल्याची शेखी मिरवत असल्याची टीका त्याने केली. चिडलेल्या निरुपम यांनी त्याच भाषेत उत्तर दिले. प्रकल्पाची अंमलबजावणी करताना, त्याची आखणी, नियोजन महत्त्वाचे असते. प्रत्यक्ष काम हा शेवटचा टप्पा असतो, असा दावाही निरुपम यांनी केला. निरुपम यांनीही प्रत्युत्तर दिल्यानंतर, काँग्रेस समर्थक आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली.

टॅग्स :एसी लोकलमुंबई