Join us  

मोनो रेल्वे स्थानकांना स्वच्छतागृहांचे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 4:44 AM

चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक या मार्गावर धावत असलेल्या मोनोरेल्वेच्या स्थानकांवर स्वच्छतागृहे नसल्याने प्रवासी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई : चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक या मार्गावर धावत असलेल्या मोनोरेल्वेच्या स्थानकांवर स्वच्छतागृहे नसल्याने प्रवासी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. महत्त्वाचे म्हणजे एवढा मोठा प्रकल्प उभारताना स्वच्छतागृहाबाबत प्रशासनाने हलगर्जीपणा दाखविल्याने प्रवाशांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.चेंबूर ते वडाळा या मार्गावर मोनोरेल्वे सुरुवातीला धावत होती. दुसरा टप्पा सुरु होण्यास तीन ते चार वर्षांचा कालावधी लोटला. पहिला टप्पा थेट कोणत्याच मार्गाशी जोडण्यात आला नसल्याने मोनोरेल्वेने फार कमी प्रवासी प्रवास करत होते. मध्यंतरी एमएमआरडीए आणि स्कोमी या कंपनीमध्ये वाद झाल्याने प्राधिकरणाने हा प्रकल्प पूर्णत: आपल्याकडे घेतला आणि मोनोरेल्वेचा दुसरा टप्पाही कार्यान्वित झाला. आता संपूर्ण मार्गावर मोनोरेल्वे धावत असतानाच मोनोरेल्वेच्या स्थानकांवरील स्वच्छतागृहाबाबत हलगर्जीपणा करण्यात आला आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, मोनोरेल्वेच्या स्थानकांवर स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. मुळात चेंबूर, वडाळा आणि संत गाडगे महाराज चौक या मोठ्या स्थानकांवर स्वच्छतागृहाची आवश्यकता होती. प्रत्यक्षात मात्र ही व्यवस्था नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, रेल्वे स्थानकांवर तैनात प्रशासनालाही याची कल्पना नसल्याचे चित्र असून,येथे स्वच्छतागृह कोठे आहे?याबाबत संबंधितांनाही पुरेशी माहिती नसल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले. दरम्यान, एमएमआरडीएशी यासंदर्भात संपर्क साधण्यात आला असता प्रशासनाकडून सांगण्यात आले की, जागा आणि डेÑनेज लाइन या दोन समस्यांमुळे येथे स्वच्छतागृहांचा अभाव आहे. जागेचा प्रश्न सुटला तरी डेÑनेजचा प्रश्न कसा सुटणार, हा प्रश्नच आहे. प्रत्येक स्टेशनखाली गटार असेलच असे नाही. येथील कर्मचारी वर्गाकरिता स्वच्छतागृह उपलब्ध आहे.

टॅग्स :मोनो रेल्वे