Join us  

रयतेच्या राज्यासाठी ‘समता मार्च’!, रायगड ते महाड पायी जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 2:37 AM

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांना, विशिष्ट समाज विभागांत बंदिस्त करण्याचे संकुचित प्रयास हाणून पाडण्यासाठी १९ मार्चला ‘समता मार्च’ निघणार आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांना, विशिष्ट समाज विभागांत बंदिस्त करण्याचे संकुचित प्रयास हाणून पाडण्यासाठी १९ मार्चला ‘समता मार्च’ निघणार आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या राजमाता जिजाऊंच्या समाधीस्थळापासून सुरू होणाºया या मार्चचा समारोप महाडच्या चवदार तळ्याजवळ होईल, अशी माहिती समता मार्च संयोजन समितीने दिली.समितीच्या निमंत्रक उल्का महाजन यांनी सांगितले, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब या दोन कृतिशूर महामानवांच्या प्रेरणा व विचारस्रोताला अभिवादन करून त्यांच्या विचारांचा जागर या समता मार्चमध्ये दिसेल, तसेच या महापुरुषांचे विचार अंमलात आणण्याचा संकल्प या वेळी जाहीर केला जाईल. या दोन्ही विभूतींची कर्मभूमी असलेल्या रायगड जिल्ह्यातील विविध समाजघटकांत व विविध प्रश्नांवर काम करणाºया संघटना एकत्र येऊन, हा समता मार्च काढणार आहेत. महाडच्या चवदार तळ्यावरील बाबासाहेबांची सत्याग्रह परिषद १९ व २० मार्च १९२७ ला झाली. प्रत्यक्ष सत्याग्रह २० मार्चला परिषदेच्या अखेरीस संपन्न झाला. मात्र, याबाबतचा ठराव व संपूर्ण आखणी ही १९ मार्चला झाली होती. तेच औचित्य साधून १९ मार्चला समता मार्चचे आयोजन केल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.समता मार्चची सुरुवात रायगडावरील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करून होईल. त्यासाठी एक गट रात्री अथवा पहाटे रायगडावर जाईल व तो सकाळी पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील जिजाऊंच्या समाधीजवळ पोहोचेल. मार्चचे मुख्य प्रस्थान पाचाड येथील जिजाऊंच्या समाधीला अभिवादन करून सकाळी १० वाजता होईल. त्यामुळे समता मार्चमध्ये सामील होणाºया इच्छुकांनी तिथेच जमावयाचे आवाहन करण्यात आले आहे. दुपारी नाते या ठिकाणी आराम करून, सायंकाळी ४.३० वाजता महाडमध्ये या मार्चचे आगमन होईल. महाडमध्ये मिरवणुकीने समता मार्च चवदार तळ्यावर पोहोचेल. या मार्गावर विविध ठिकाणी मार्चचे स्वागत, प्रबोधनपर गीते व छोटेखानी सभा होतील, तर सांगता समारंभ चवदार तळ्यावर होईल.>संपूर्ण मार्चमध्ये केवळ ‘तिरंगा’ फडकणारसमता मार्चमध्ये विविध संघटना आणि संस्था सामील होत असून, प्रत्येकाने आपापले बॅनर आणण्याचे आवाहन समितीने केले आहे. मात्र, कोणत्याही संघटनेला त्यांचा झेंडा घेऊन मार्चमध्ये प्रवेश मिळणार नाही. संपूर्ण मार्चमध्ये केवळ तिरंगा (राष्ट्रध्वज) घेऊनच सामील होता येईल, अशी माहिती समितीच्या निमंत्रकांनी दिली. आपली सर्वांची ‘भारतीय’ ही सामायिक असलेली ओळख अधोरेखित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे निमंत्रकांनी स्पष्ट केले.