Join us

बलुतेदारांना ७९ कोटींची कर्जमाफी

By admin | Updated: August 17, 2014 23:33 IST

सुरेश पाटील : शासनाकडून रक्कम निश्चित

सांगली : महाराष्ट्रातील कारागीर हमी योजनेअंतर्गत थकित असलेल्या ७९ कोटी २४ लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने १४ आॅगस्ट रोजी घेतला आहे, अशी माहिती खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. म्हणाले की, मंडळाअंतर्गत राज्यातील बलुतेदार व ग्रामोद्योग सहकारी संस्थांच्या सभासदांना विविध ग्रामोद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षापासून ते विविध कारणामुळे थकीत असल्यामुळे अशा कारागीरांना पुन्हा कर्ज मिळणे मुश्किल झाले होते. तालुकास्तरावरील एकूण ३११ बलुतेदार सहकारी संस्थांच्या सभासदांना जिल्हा सहकारी बँकांमार्फत वाटप झालेले कर्ज माफ करण्यास ३१ डिसेंबर २0१२ ला राज्य शासनाने तत्त्वत: मंजुरी दिली होती. त्यानंतर काही त्रुटींमुळे प्रत्यक्षात कर्जमाफी देण्यात काही अडचणी निर्माण झाल्या. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थांना याप्रश्नी कर्जमाफीच्या रक्कम निश्चितीचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही रक्कम निश्चित केल्यानंतर तीन दिवसांपूर्वी शासनाने यासंदर्भात आदेश काढून ७९ कोटी २४ लाख ६ हजार १६0 रुपयांच्या कर्जमाफीस मंजुरी दिली आहे. त्यामुळे अशा कारागीरांना पुन्हा कर्ज मिळण्यास येत असलेल्या अडचणी आता दूर होतील, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)