Join us  

भारताला महासत्ता बनवण्यासाठी संतांनी मार्गदर्शन करावे - मंगलप्रभात लोढा

By मनोहर कुंभेजकर | Published: February 23, 2024 5:36 PM

महासंस्कृती महोत्सव 2024 अंतर्गत मुंबई उपनगर जिल्हा आयोजित संत संमेलनाचे उदघाटन मुंबई उपनगराचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. अयोध्येत राम मंदिर साकारण्यात देशातील साधू संतांचे योगदान मोठे असून त्यांचे आशीर्वाद आहे. त्यामुळे संतांचा सन्मान करण्यासाठी दोन दिवसीय संत संमेलनास विलेपार्ले पश्चिम येथील संन्यास आश्रमात आज सकाळी दिमाखात सुरुवात झाली.

महासंस्कृती महोत्सव 2024 अंतर्गत मुंबई उपनगर जिल्हा आयोजित संत संमेलनाचे उदघाटन मुंबई उपनगराचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. या संमेलनाची संकल्पना त्यांची होती. त्यांनी उपस्थित संतांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. यावेळी पालक मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर साकारण्यात आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात संतांचे मोठे योगदान आहे.संत गावोगावी फिरले,संतांनी आजच्या तरुण पिढीला घरोघरी जावून संस्कार दिले. आज आपल्या अध्यात्मिक शक्तिमुळे जग भारतापुढे नतमस्तक होत असून देशाची विश्वगुरुकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे.यासाठी संतांचे मार्गदर्शन मोलाचे आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.देशात रामराज्य आणण्यासाठी आणि भारताला महासत्ता बनवण्यासाठी आपण आम्हाला मार्गदर्शन करा असे आवाहन त्यांनी उपस्थित संतांना केले.

यावेळी अखिल भारतीय जनजागरण प्रमुख शरद ढोले म्हणाले की,देशात रामराज्य आणणे हे फक्त संतांचे काम नसून त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेवून प्रत्यक्ष सहभाग घेणे गरजेचे आहे.अयोध्येत श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळी देशातील सुमारे साडेचार हजार संत तिकडे उपस्थित होते आणि देशातील साडेपाच लाख गावांमध्ये दिवाळी साजरी केली असे त्यांनी अभिमानाने सांगितले.देशात साधारणपणे डिसेंबर महिन्यात होणारे धर्मांतर रोखण्यासाठी गावोगावी जाण्याची आवश्यकता असून हिंदूंना संघटित करून हिंदुत्व वृद्धिंगत करण्याचे त्यांनी उपस्थित साधू संतांना आवाहन केले. यावेळी मंचकावर विश्वेश्वरानंद,शरद ढोले, महामंडलेश्वर चिन्मयानंद, महेंद्र संगोई,निवासी उप जिल्हाधिकारी सतीश बागल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :मंगलप्रभात लोढामुंबई