Join us  

सह्याद्रीकन्येने पार केली हिमशिखरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 7:20 AM

कोणतेही क्षेत्र असो, मुलींनी पुढाकार घ्यायला हवा. अंगभूत जिद्द, खंबीर मानसिकता आणि पालकांच्या पाठिंब्याने मुली कोणतेही यश संपादन करू शकतात, असा विश्वास गिर्यारोहक प्रियंका मोहिते यांनी व्यक्त केला.

मुंबई  - कोणतेही क्षेत्र असो, मुलींनी पुढाकार घ्यायला हवा. अंगभूत जिद्द, खंबीर मानसिकता आणि पालकांच्या पाठिंब्याने मुली कोणतेही यश संपादन करू शकतात, असा विश्वास गिर्यारोहक प्रियंका मोहिते यांनी व्यक्त केला. जगातील चौथ्या क्रमाकांचा सर्वाेच्च शिखर ‘माउंट ल्होत्से’ला गवसणी घालणाऱ्या प्रियंकाच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित करण्यात आला होता, या वेळी प्रियंका बोलत होती.प्रियंका म्हणाली की, शाळकरी जीवनातच ट्रेकिंगची आवड लागली. अनेक गड, किल्ल्यांवर भ्रमंती केली. त्यानंतर, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने हिमालय सर करण्याचे धाडस स्वीकारले. ट्रेकिंगबरोबर नृत्याच्या धडेदेखील गिरविले आहेत. नृत्य शिकणारे पाय हिम शिखरावर पडण्याच्या तयारीत आले आणि वयाच्या २१व्या वर्षी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केला. एव्हरेस्ट सर करत असताना मनात धाकधुक होतीच. मात्र, जिद्दीमुळे एव्हरेस्ट सर केला. एव्हरेस्टनंतर अत्यंत अवघड श्रेणीचे, हिम वादळ वाहणारे माउंट ल्होत्से याला गवसणी घालण्याचे ठरविले. मात्र, हवामानाच्या बदलामुळे लगेच शक्य झाले नाही. या वर्षी माउंट ल्होत्से सर करण्याची संधी मिळाली. माउंट ल्होत्से सर करताना ताशी १०० ते १५० कि.मी. वेगाने वाहणारे वादळी हिमवादळे, उणे २० ते २५ अंश सेल्सिअस तापमान, पिण्याच्या पाण्याची समस्या, आॅक्सिजन अपुरा पुरवठा, हाड गोठवणारी थंडी या अडचणीवर मात करुन शिखर पार करत देशाचा तिरंगा अभिमानाने फडकविला, असेही तिने सांगितले.प्रियंकाचे वडीलदेखील या वेळी उपस्थिती होते. ते म्हणाले की, पुरोगामी महाराष्ट्रात आजही मुलींना आवडीचे शिक्षण निवडण्याची संधी दिली जात नाही. मुलीवर खर्च करण्यास पालक राजी होत नाहीत.प्रियंकाने माउंट एव्हरेस्ट सर केल्यावर सरकारकडून कौतुक करण्यात आले. मात्र, तत्कालीन राज्य सरकारकडून जाहीर झालेली आर्थिक मदत मिळाली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, दुर्गप्रेमी राजेंद्र वराडकर , महिला गिर्यारोहक आणि भारतीय पर्वतारोहण संस्थानच्या के. सरस्वती, कृत्रीम प्रस्तरारोहणाचे आंतरराष्ट्रीय परिक्षक असलेले अजित कुशे आदी उपस्थित होते.कोण आहे प्रियंका मोहिते१६ मे २०१८ रोजी जगातील चौथ्या क्रमांकाचे अत्युच्च आणि अत्यंत अवघड श्रेणीचे हिमशिखर माउंट ल्होत्से ( ८ हजार ५१६ मीटर) यशस्वीरीत्या सर करण्याची विक्रमी कामगिरी वयाच्या २५ व्या वर्षी केली आहे. सन २०१३ मध्ये प्रियंकाने सर्वाेच्च शिखर माउंट एव्हरेस्ट (८ हजार ८५० मीटर) शिखराला गवसणी घातली. प्रियंकाने बी.एससीचे शिक्षण घेतले आहे. नृत्य शिक्षणात विशारद मिळविले आहे. प्रियंका बंगळुरू येथे एका बायोटेक कंपनीमध्ये संशोधक म्हणून काम करते. सकाळी ८ ते संध्याकाळी ५ अशी नोकरी करत उरलेल्या वेळात ती मोहिमांचा व पर्वत चढाईचा सराव करत असते. जगातील सर्वच आठ हजार उंचीची शिखरे सर करण्याचा तिचा मानस आहे. येत्या आॅक्टोबर महिन्यात प्रियंका मनसलू किंवा मकालू यापैकी एक शिखर सर करणार आहे.

टॅग्स :मुंबईबातम्या