Join us  

मतांसाठी धावपळ; चाळी पिंजून काढण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 4:26 AM

बहुसंख्य मतदार दक्षिण भारतीय असल्याने भाजपने येथे पुन्हा कॅप्टन तमिळ सेल्वन यांना उमेदवारी दिली.

मुंबई : एकगठ्ठा दक्षिण भारतीय मतदारांमुळे भाजपसाठी एकतर्फी लढत वाटत असलेल्या सायन कोळीवाड्यात काँग्रेसच्या आक्रमकतेने चुरस आणली आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात असल्याने दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आता उत्तर भारतीय आणि मुस्लीम मतदारांकडे मोर्चा वळवला आहे. एकीकडे भोजपुरी सुपरस्टार्सला प्रचारासाठी आणण्याची चढाओढ तर दुसरीकडे हायटेक प्रचारही जोमात सुरू आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून दोन्ही उमेदवार एकमेकांवर निशाणा साधत आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील प्रचार चांगलाच रंगला आहे.

बहुसंख्य मतदार दक्षिण भारतीय असल्याने भाजपने येथे पुन्हा कॅप्टन तमिळ सेल्वन यांना उमेदवारी दिली. पालिकेतील विरोधी पक्षनेते व अनुभवी ज्येष्ठ नगरसेवक रवी राजा यांना डावलून काँग्रेसने येथे मुंबई युवा अध्यक्ष गणेश यादव यांना संधी दिली. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे अमिरुद्दीन अलकमर नजिमुद्दीन आणि मनसेचे अनंत लक्ष्मण कांबळे यांच्यासह एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खरी लढत भाजप-काँग्रेसमध्ये आहे. नवीन चेहरा असल्याने काँग्रेसने येथे आपल्या उमेदवारासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

मूळचे दक्षिण भारतीय असलेल्या यादव यांना ३५ ते ४० हजार उत्तर भारतीय मतेही मिळावीत, यासाठी भोजपुरी सुपरस्टार्सचे रोड शो आयोजित करण्यात आले. उत्तर भारतीय मतांसाठी भाजपचे सेल्वन यांनीही भोजपुरी स्टार्सना प्रचारात उतरविले.भाजपचे दिल्ली अध्यक्ष व भोजपुरी सुपरस्टार मनोज तिवारी यांच्यापाठोपाठ उत्तर प्रदेशच्या शिक्षणमंत्री अनुपमा जयस्वाल यांनीदेखील मतदारसंघात हजेरी लावली. बुधवारी प्रतीक्षानगर येथे आमदार प्रसाद लाड यांची चौकसभा तर सायन कोळीवाडा येथील म्हाडा ट्रान्झिट कॅम्पमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर यांच्या सभेने वातावरण तापले. मुस्लीम मतांसाठी काँग्रेसची धावपळ सुरू असताना दिसून आली. काँग्रेसचे नगरसेवक सुफियान वनू त्यांच्यासाठी मेहनत घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे पदयात्रा, चौकसभांबरोबरच सेल्वन आणि यादव यांचा सोशल प्रचारही रंगतो आहे़चांदिवली विधानसभेत काँग्रेस आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्ये चुरस असून, बुधवारी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी अनुक्रमे नसीम खान आणि दिलीप लांडे यांनी पदयात्रा आणि चौकसभेवर भर दिला. विशेषत: मतदारांशी व्यक्तिगत संवाद साधण्यावर हे दोन्ही उमेदवार भर देत असून, उर्वरित पक्षांचे उमेदवारही मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर देत आहेत.

काँग्रेसने येथून नसीम खान, शिवसेनेने दिलीप लांडे, मनसेने सुमित बारस्कर, वंचित बहुजन आघाडीने अबुल हसन खान आणि आपने सिराज खान यांना उमेदवारी दिली आहे. चांदिवली विधानसभेत पदयात्रा, चौकसभांवर भर दिला जात आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता नसीम खान यांनी उदयनगरपासून सुरू केलेली पदयात्रा मच्छी मार्केट, सेवई हॉटेल, भानुशाली वाडा, खान मेडिकल, राम जोशी इमारत येथे समाप्त केली. तसेच बाबा चौक, शमशाद हॉटेल, संजयनगर, अमिना हॉटेल, तिलकनगर, साकीनाका येथे चौकसभाही घेतल्या. तर दिलीप लांडे यांनी बुधवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मनुबाई चाळ, तंबी हॉटेल, डिसोजा चाळ, जयभीमनगर, नाहर कॉम्प्लेक्स, संघर्षनगर, नेन्सी मुन्सी चाळ, शांतीनगर चाळ येथे प्रचार व प्रसार करण्यावर भर दिला.

मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि आप हे पक्षदेखील येथे जोमाने प्रचार करीत असून, दिवसेंदिवस येथील निवडणूक आणखी चुरशीची होत आहे. शिवसेनेव्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अबुल हसन खान हेदेखील जोमाने प्रचार करीत आहेत. पत्रकांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीकडून बुधवारी करण्यात आला.मनसेदेखील आपला प्रचार व प्रसार वेगाने करीत असून, येथील मराठी मतदारांसह इतर भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून प्रयत्न केले जात आहेत. आपचे सिराज खान यांना जेव्हा उमेदवारी घोषित झाली; तेव्हा प्रचारासाठी लागलेला जोर आता मात्र दिसून येत नसल्याचे चित्र आहे.रहिवाशांनी वाचला समस्यांचा पाढामुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांच्या उमेदवारांची धावपळ सुरू आहे. मतदारांच्या भेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन करत आहेत, परंतु कुर्ला विधानसभेचे शिवसेना युतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार मंगेश कुडाळकर गौरीशंकरनगर येथे प्रचारासाठी गेले असता, नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर वाचला, तसेच या समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी केली.बुधवारी मंगेश कुडाळकर यांची गौरीशंकर मंदिर, नागसेना वाडी, जोशी वाडी, गौरीशंकरनगर, गौरीशंकर बिल्डिंग नं १, डी. के. मिस्त्री चाळ, कमलाबाई चाळ, हंस बिल्डिंग सकीनाबाई चाळ, पांडे चाळ, विजय महल, म्हाडा वसाहत, भारतीयनगर या भागात प्रचार केला.दरम्यान, या भागात कुर्ला सीएसटी रोडवर वाहतूककोंडी होती. त्यामुळे गौरीशंकरनगर परिसरात जाण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गौरीशंकर मंदिर, लक्ष्मी निवास, नागसेना वाडी, जोशी वाडी, गौरीशंकरनगर, गौरीशंकर बिल्डिंग नं १ आदी भागांत लादीकरण, मलनिस्सारण वाहिनीची कामे प्रलंबित आदी समस्या रहिवाशांनी यावेळी मांडल्या. त्याचप्रमाणे, म्हाडा वसाहत, भारतीयनगर या भागातील रहिवाशांनी बेस्टच्या बसबाबत अनेकदा मागणी करूनही बस सुरू झाली नाही, असे सांगितले. बेस्टच्या मिनी बस आल्यानंतर बस सुरू होणार आहे, असे कुडाळकर यांनी सांगितले.