Join us  

नव्या शैक्षणिक प्रगतीसाठी मुंबई विद्यापीठाचा रोडमॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 3:27 AM

नव्या कुलगुरूंसोबत विद्यापीठातील नव्या शैक्षणिक रोडमॅपसाठी मुंबई विद्यापीठ सज्ज होत आहे

सीमा महांगडेमुंबई : नव्या कुलगुरूंसोबत विद्यापीठातील नव्या शैक्षणिक रोडमॅपसाठी मुंबई विद्यापीठ सज्ज होत आहे. त्यासाठी सध्या मुंबई विद्यापीठाच्या आगामी पाच वर्षांसाठीचा बृहत आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कॉलेजेस, त्यामधील प्राचार्य, विद्यार्थी, संस्थाचालक यांच्याकडून १६ मे पर्यंत सूचना मागविण्यात आल्या आहेत, तसेच शिक्षण संस्था, शिक्षणप्रेमी मंडळींनी नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव १६ मे पर्यंत विद्यापीठाला सादर करण्याचे निर्देश विद्यापीठाकडून देण्यात आले आहेत.महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक विद्यापीठ त्यांच्याकरिता बृहत आराखडा तयार करतात. मुंबई विद्यापीठातही २०१८-२०१९ ते २०२२-२०२३ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी सम्यक योजना-बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यासाठी आधी या बृहत आराखड्यासाठी सूचना मागविण्यात येत असून, १७ मे रोजी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. हा बृहत आराखडा अगदी तंत्रशुद्ध पद्धतीने तयार करण्यात येणार असल्याने, आलेल्या सूचनांवर मार्गदर्शक तत्त्वांवर या कार्यशाळेत प्रकुलगुरू, व्यवस्थापन परिषद सदस्य, महाविद्यालयांचे अधिष्ठाता, महाविद्यालयांचे प्राचार्य, अध्यापक, शिक्षणतज्ज्ञ यांच्याकडून सविस्तर चर्चा घेऊन, कार्यपद्धती आखली जाणार आहे.राज्यातील विद्यापीठांचे बृहत आराखडे तयार करण्याबाबत, डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने समिती नेमली होती. या समितीच्या शिफारसीनुसार, नवीन महाविद्यालय किंवा परिसंस्थांना ज्या शैक्षणिक वर्षांपासून परवानगी हवी आहे, त्यांच्यासाठी निकष ठरवून दिले आहेत. त्या निकषानुसार मुंबई विद्यापीठाच्या या पंचवार्षिक बृहत आराखड्यावर काम केले जाणार असल्याला मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांनी दुजोरा दिला आहे.