Join us  

कोरोनामुक्त झाल्यानंतर थायराॅईडचा धोका, तज्ज्ञांचे निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:08 AM

मुंबई : कोरोना बरा झाल्यानंतर त्याचे शरीरावर वेगवेगळे परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. कोरोना रुग्णांमध्ये पूर्वी थायरॉइडचा आजार नसलेल्या ...

मुंबई : कोरोना बरा झाल्यानंतर त्याचे शरीरावर वेगवेगळे परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. कोरोना रुग्णांमध्ये पूर्वी थायरॉइडचा आजार नसलेल्या सबॲक्युट थायरॉयडायटिस, हा विषाणूबाधेमुळे किंवा विषाणूबाधेनंतर उद्भवणारा थायरॉयइड आजार विकसित होत असल्याचे आढळून आल्याचे ‘द जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रिनोलॉजी अँड मेटॅबोलिझम’ या मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखामध्ये नोंदविण्यात आले आहे.

थायरॉइड ग्रंथींमध्ये हळूहळू किंवा अचानक जाणवणारी वेदना, थायरॉइड ग्रंथींना येणारी वेदनादायक सूज अनेक आठवडे किंवा महिने तशीच राहू शकते. थायरॉइड ग्रंथींमधील स्राव अतिरिक्त प्रमाणात स्रवत असल्याची (हायपरथायरॉइडिझम) लक्षणे, उदा. चिंताग्रस्तता, हृदयाचे ठोके जलद गतीने पडणे आणि उष्णता सहन न होणे ही या आजाराची सुरुवातीची लक्षणे आहेत. नंतर थायरॉइड ग्रंथीमधील स्राव अतिशय कमी प्रमाणात स्रवत असल्याची (हायपोथायरॉइडिझम) थकवा, बद्धकोष्ठता किंवा गारवा सहन न होणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येऊ लागतात. काही काळाने या ग्रंथींचे कार्य पूर्ववत होते. पण, तरीही ही गोष्ट गांभीर्याने घ्यायला हवी, अशी माहिती कन्सल्टन्ट एंडोक्रिनोलॉजिस्ट व डायबेटोलॉजिस्ट डॉ. श्वेता बुदयाल यांनी दिली आहे.

वेळच्या वेळी निदान झाल्यास कोविड-१९ मुळे उद्भवलेला सबॲक्युट थायरॉयडायटिस दाहशामक औषधे आणि कोर्टिकोस्टेरॉइड उपचारांना चांगला प्रतिसाद देतो. लवकरात लवकर झालेले निदान आणि वेळच्या वेळी घेतलेला दाहशामक औषधोपचार यांच्या आधारे या आजाराचे यशस्वी व्यवस्थापन शक्य आहे.

सबॲक्युट थायरॉयडायटिस किंवा पोस्ट व्हायरल थायरॉयडायटिस म्हणजे काय?

सबॲक्युट थायरॉयडायटिसमध्ये थायरॉइड ग्रंथींना सूज येते. श्वसनसंस्थेच्या वरच्या भागाला संसर्ग झाल्यानंतर उद्भवणारी ही स्थिती आहे थायरॉइड ग्रंथींना विषाणूसंसर्ग झाल्याने निर्माण होणारी समस्या तशी सर्रास आढळून येत नाही. गालगुंडांसाठी कारणीभूत ठरणारा विषाणू, इन्फ्लुएन्झाचा विषाणू आणि श्वसनसंस्थेवर परिणाम करणारे इतर विषाणू सबॲक्युट थायरॉयडायटिससाठी कारणीभूत ठरत असल्याचे आढळून आले आहे.