Join us

पोषणाअभावी मुलांमध्ये रक्तक्षयाचा धोका

By admin | Updated: June 30, 2015 01:16 IST

महिलांमध्ये पोषण द्रव्यांचा अभाव असल्यास त्यांच्या मुलांना रक्तक्षय होण्याचा धोका अधिक असतो. देशात आणि आशिया खंडातील बहुतेक भागात ७० टक्के

मुंबई : महिलांमध्ये पोषण द्रव्यांचा अभाव असल्यास त्यांच्या मुलांना रक्तक्षय होण्याचा धोका अधिक असतो. देशात आणि आशिया खंडातील बहुतेक भागात ७० टक्के लहान मुलांना रक्तक्षय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शरीरात पोषक द्रव्यांचा अभाव असल्यास रक्तक्षय होण्याचा धोका अधिक असतो. लोह, फॉलिक आम्ल, जीवनसत्व ब १२, प्रथिने, जीवनसत्व अ, क आणि ब गटातील जीवनसत्व कमी पडल्यामुळे हा आजार उद्भवतो. तीन वर्षांखालील मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. रक्तक्षयामुळे लहान वयातच मुलांची वाढ खुंटते. माहितीचा अभाव आणि मर्यादित साधनांमुळे अनेकदा या आजारावर नियंत्रण आणणे शक्य होत नाही. रक्तक्षयामागे कुपोषण हे सर्वसामान्य कारण आहे. तांबड्या पेशी पुरेसा आॅक्सिजन पुरवू शकत नाहीत, तेव्हा हा आजार झाल्याचे दिसून येते. रक्तक्षय झालेल्यांना थकवा जाणवणे, अंग फिकट होणे, छातीत धडधड वाढणे, धाप लागणे ही लक्षणे दिसून येतात. देशातील ५ टक्के लोकसंख्येला रक्तक्षयाचा प्रादुर्भाव जाणवतो. हा प्रश्न अधिक गंभीर होता़ पुरुषांच्या तुलनेत महिलांना याचा प्रादुर्भाव अधिक होतो, असे वाडिया रुग्णालयातील बालरोग चिकित्सक डॉ. मुकेश देसाई यांनी सांगितले.