मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांवर रात्री-अपरात्री डेब्रिज ओतणाऱ्या डम्परची छायाचित्रासह सविस्तर माहिती दिली तर महापालिका अशा सजग नागरिकांना चक्क १० हजार रुपये बक्षीस देणार आहे. तशी घोषणाच महापालिका प्रशासनाने शुक्रवारी केली असून, अनधिकृतपणे दगडमाती टाकणाऱ्या डम्पर मालकांना आळा घालण्यासाठी ही कार्यवाही हाती घेतली आहे.महापालिकेच्या हद्दीतील विभागात रात्रीच्या वेळेस डम्पर मालकांकडून अनधिकृतपणे दगडमाती टाकण्यात येत असल्याचे सातत्याने निदर्शनास येते आहे. विभागातील कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे दगडमाती टाकणाऱ्या डम्पर मालकांना शोधून काढणे कठीण जात आहे. अशा प्रकारची वाहने रस्त्यांवर दगडमाती टाकताना दिसल्यास त्याची दिनांक, वेळ व स्थळासहित छायाचित्र काढून माहिती देणाऱ्याला बक्षीस देण्याचे महापालिकेने घोषित केले आहे. माहिती देणाऱ्यांनी सादर केलेल्या छायाचित्रामध्ये वाहन क्रमांक वाचनीय असेल, असे छायाचित्र काढून, ज्या जागेवर छायाचित्र काढले आहे ती जागा ओळखण्यासाठी लँडमार्क स्पष्टपणे दिसेल, असे छायाचित्र पाठवावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
अनधिकृत डेब्रिज डम्परसाठी बक्षीस!
By admin | Updated: August 22, 2015 01:05 IST