Join us  

दहीहंडीतून संकल्प प्रतिष्ठानची माघार

By admin | Published: September 02, 2015 3:11 AM

वरळीतील नामांकित दहीहंडी आयोजक संकल्प प्रतिष्ठानसोबत आणखी सहा आयोजकांनी यंदा दहीहंडी उत्सवाचे आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे

मुंबई : वरळीतील नामांकित दहीहंडी आयोजक संकल्प प्रतिष्ठानसोबत आणखी सहा आयोजकांनी यंदा दहीहंडी उत्सवाचे आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शासन धोरण आणि नियमांत असलेल्या विसंगतीमुळे आयोजन रद्द करीत असल्याचा आरोप संकल्प प्रतिष्ठानचे सचिन अहिर यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा दिला असला तरी तसे अधिकृत परिपत्रक अद्याप सरकारने काढले नसल्याचा आरोप अहिर यांनी केला. ते म्हणाले की, शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अद्याप परिपत्रकाची प्रत प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. शिवाय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांच्या आदेशांमध्ये आणि शासन धोरणात विसंगती आहे. नेमके कोणते नियम पाळायचे, याबाबत आयोजकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे जाचक अटी शिथिल करून सुस्पष्टता आणल्यास भविष्यात पुन्हा दहीहंडीचे आयोजन करू, असेही त्यांनी सांगितले.गोविंदा पथकांवर किंवा आयोजकांवर कारवाई झाली तर काय, याबाबत गोविंदा पथक आणि आयोजकांमध्ये संभ्रम असल्याने आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचेही अहिर यांनी स्पष्ट केले.