Join us

मोबाइल बिझी असतानाही आमदार, मंत्र्यांच्या फोनना तत्काळ प्रतिसाद द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:05 IST

सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना : मोबाइलच्या वापरासंबंधी निर्बंध जारीजमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना ...

सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना : मोबाइलच्या वापरासंबंधी निर्बंध जारी

जमीर काझी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता मोबाइलवर बोलत असताना जर एखाद्या आमदार, मंत्र्यांचा किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आल्यास बोलणे थांबवून तत्काळ त्यांच्या फोनला प्रतिसाद द्यावा लागणार आहे. अन्यथा त्यांना कारवाईच्या बडग्याला सामोरे जावे लागणार आहे.

राज्य सरकारने शासकीय कामकाज करताना मोबाइल फोनचा वापर करण्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या फोनला आपला मोबाइल बिझी असला तरीही तत्काळ उत्तर द्यायचे आहे.

सामान्य प्रशासन विभागाकडून शासकीय कामकाजाच्या वेळेत मोबाइल फोन वापराबाबत शुक्रवारी परिपत्रक जारी करून एकूण विविध ११ सूचना केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कार्यालयीन कामासाठी प्राधान्याने कार्यालयातील दूरध्वनीचा वापर करावा. कार्यालयीन वेळेत आवश्यक असेल तेव्हाच भ्रमणध्वनीचा वापर करावा, बोलताना वाद घालू नये तसेच असंसदीय भाषेचा वापर करू नये. कार्यालयीन कामासाठी मोबाइलवर लघू संदेशाचा (Text Message) शक्यतो वापर करावा. तसेच मोबाइल फोनवर बोलताना कमीत कमी वेळेत संवाद साधावा, समाज माध्यमांचा वापर करताना वेळेचे आणि भाषेचे तारतम्य बाळगावे. अत्यावश्यक वैयक्तिक दूरध्वनी हे कक्षाच्या बाहेर जाऊन घ्यावेत. अधिकाऱ्यांच्या कक्षात, बैठकीदरम्यान मोबाइल सायलेंट किंवा व्हायब्रेंट मोडवर ठेवावा, आदींचा त्यामध्ये समावेश आहे. या सूचनेची अंमलबजावणी तातडीने करावयाची आहे.

पहिल्यांदा ड्रेसकोड आता मोबाइल

सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी डिसेंबरपासून ड्रेसकोड लागू केला आहे. त्यानुसार सरकारी कार्यालयातून जीन्स आणि टी-शर्ट बंदी घालण्यात आले.