दिपक मोहिते, वसईसोमवारच्या आरक्षण सोडतीत ११५ जागांपैकी ५८ जागांवर महिलांना संधी मिळाली आहे. ५० टक्के महिलांना आरक्षण देण्याच्या शासनाच्या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात आली आहे. महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाल्यामुळे पुरूषांची मात्र पंचाईत झाली आहे. अनेकांना नगरसेवकपदापासून वंचीत राहावे लागणार आहे.आरक्षण सोडतीमध्ये मागासवर्ग पुरुष प्रवर्ग - १५, अनु. जाती पुरूष प्रवर्ग - २, अनु. जमाती पुरूष प्रवर्ग - २ व सर्वसाधारण गट - ३८ अशा एकूण ५७ ठिकाणी पुरूष उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. परंतु या आरक्षणाचा फटका अनेक विद्यमान नगरसेवकांना बसला आहे. अनेकांच्या प्रभागावर महिलांचे आरक्षण आल्यामुळे आता काही नगरसेवक पत्नीचे नाव पुढे करण्याच्या तयारीत आहेत. त्यास विविध राजकीय पक्षांकडून कसा प्रतिसाद लाभतो यावर सारे काही अवलंबून आहे. बहुजन विकास आघाडी व शिवसेना वगळता एकाही पक्षाकडे एवढ्या मोठ्या संख्येने महिला उमेदवार मिळणे दुरापास्त आहे. त्यामुळे उमेदवार शोधताना भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य लहान पक्षांची दमछाक होणार आहे. प्रभाग रचनेमध्येही अनेक प्रभागातील परिसर एकत्र करून नवीन प्रभाग निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक नगरसेवकांचे मतांचे गणित चुकून ते वजाबाकीच्या घरात जाण्याची शक्यता आहे. एकीकडे आरक्षण व दुसरीकडे प्रभागाचे तुटलेले लचके अशा दुहेरी कात्रीत नगरसेवक सापडले आहेत. आपल्या पत्नीला उमेदवारीसाठी पुढे केले तरी पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांकडून तिकिट मिळेल की नाही याची शाश्वती नसल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. बुधवारी प्रभाग रचना जाहीर होत आहे. एकुण ११५ प्रभाग झाल्यामुळे अनेकांच्या प्रभागाचे क्षेत्र कमी झाले आहे. असे असतानाही मतदारांची संख्या मात्र कमी झालेली नाही. गेल्या ५ वर्षात नवीन मतदारांची भर पडल्यामुळे गेल्यावेळी असलेल्या मतदारांपेक्षाही अधिक मतदार यावेळी आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. आरक्षण व प्रभागरचना इ. कार्यक्रम पार पडला असता तरी सध्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. हा कार्यक्रम एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसरी सार्वत्रिक निवडणुक ३० मे रोजी होण्याची शक्यता आहे. प्रभाग रचनेनंतर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे.
आरक्षण, विभाजन ठरले डोकेदुखी
By admin | Updated: March 31, 2015 22:39 IST