Join us  

निवडणुकीच्या तोंडावर असंतोषाची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 1:30 AM

मुंबईत पार्किंगची व्यवस्थाच नाही, अशा वेळी दहा दहा हजारांचा दंड आकारण्याच्या पालिकेच्या भूमिकेमुळे खूप मोठा असंतोष उफाळून येण्याचा धोका आहे.

मुंबई : अनधिकृत पार्किंगविरोधात दहा हजारांहून अधिकचा दंड आकारण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सामान्य मुंबईकरांच्या मनात असंतोषाचा भडका उडण्याची भीती राजकीय नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषत: सत्ताधारी शिवसेना आणि भाजप नेत्यांची अवस्था सांगताही येईना आणि सहनही होईना अशी झाली आहे. तर विरोधकांनी आधी पार्किंग धोरणाबाबत स्पष्टता आणण्याची मागणी केली आहे.

मुंबईत पार्किंगची व्यवस्थाच नाही, अशा वेळी दहा दहा हजारांचा दंड आकारण्याच्या पालिकेच्या भूमिकेमुळे खूप मोठा असंतोष उफाळून येण्याचा धोका आहे. निवडणुकांच्या तोंडावर अशा प्रकारची कारवाई धोकादायक ठरू शकते. नागरिक पार्किंगला पैसे द्यायला तयार आहेत, पण पालिका त्या तुलनेत व्यवस्थाच देऊ शकली नाही. सुविधा देता येत नसेल तर अशा प्रकारची दंड आकारणी धोकादायक ठरू शकते, अशी भावना मुंबईतील वरिष्ठ भाजप नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली. आपण काही द्यायला तयार नाही, विशेषत: प्रवासामुळे लोक हैराण झालेले आहे. त्यात अशी कारवाई विनाकारण नकारात्मकता वाढीस लावणारी असल्याची भावना या नेत्याने व्यक्त केली. मुंबई शहरात पार्किंग एफएसआयच्या नावाखाली करोडोंचा एफएसआय वाटण्यात आला.

पार्किंसाठीचे हे चांगले धोरण होते, त्याचे पुढे काय झाले? अनेक विकासकांनी अद्याप पार्किंग पालिकेकडे सोपविलेच नाही, याबाबत आधी पालिकेने खुलासा करायला हवा, अशी मागणी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली. अनेक पार्किंगचे कंत्राट पालिकेने खासगी लोकांना दिले, तिथे अव्वाच्या सव्वा दर आकारला जात आहे. काही ठिकाणी पब आणि इतर प्रकार सुरू आहेत. याबाबत पालिकेने आधी खुलासा करायला हवा, असे अहिर यांनी सांगितले.