Join us  

‘प्लास्टिक’ तांदळाचा अहवाल १५ दिवसांत येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना प्लास्टिकचा तांदूळ पुरविल्याचा शाळेने आरोप केल्यावर त्याचे नमुने मंगळवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना प्लास्टिकचा तांदूळ पुरविल्याचा शाळेने आरोप केल्यावर त्याचे नमुने मंगळवारी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. ज्याचा अहवाल दोन आठवड्यांत येणार असून, त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. प्लास्टिक तांदळाच्या तक्रारी पालघर आणि अहमदनगरमध्येही आल्या असून, त्यात तथ्य नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

मालाडच्या पठाणवाडी उर्दू प्रायमरी ॲण्ड हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शबाना शेख यांच्या म्हणण्यानुसार तांदूळ शिजल्यावर तो रबराप्रमाणे लागतो, तर बऱ्याचदा तांदूळ शिजत नसल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या. मुलांना असे अन्न देऊन त्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पालकांनी केल्याचेही त्या म्हणाल्या. त्यानुसार पालिकेने याची गंभीर दखल घेत मंगळवारी एका पथकामार्फत तांदळाचे नमुने गोळा करत ते प्रयोगशाळेत पाठविले. त्यानुसार त्याचा अहवाल येण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. या अहवालावरून ते तांदूळ होते की प्लास्टिक, याचा उलगडा होईल आणि संबंधित कंत्राटदाराला कारवाईला सामोरे जावे लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना मालाडच्या एका उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेने पालकांच्या आक्षेपानंतर पालिका आणि कुरार पोलिसांकडे तोंडी तक्रार केली. दरम्यान, प्लास्टिक तांदूळ वितरित केल्याची तक्रार पालघर व अहमदनगरमध्येही आली आहे. याबाबत भारतीय अन्न महामंडळाकडून अभिप्राय घेण्यात आला असून, तक्रारीत तथ्य नसून तेही फॉर्टिफाइड तांदूळच असल्याचे उघड झाल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारच्या संकेतस्थळाला भेट द्या!

फॉर्टिफाइड तांदळाबाबत माहिती घेण्यासाठी केंद्र सरकारच्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर भेट देत याबाबत अधिक माहिती घेण्याचा सल्ला दिला जात आहे.