Join us  

मुंबईसह सहा शहरांतील घरभाडे भिडले गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 1:35 AM

मुंबईतील वरळी आणि ताडदेव या परिसरांमध्ये दोन हजार स्क्वेअर फूट घराचे भाडे २०१४ साली १ लाख ६५ हजार ते २ लाख २० हजार दरम्यान होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईसहित देशातील सहा मोठ्या शहरांमधील घरभाड्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मागील ७ वर्षांमध्ये घरभाड्याच्या किमतीत १७ ते २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब्रोकरेज कंपनी अ‍ॅनरॉकच्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. 

मुंबईतील वरळी आणि ताडदेव या परिसरांमध्ये दोन हजार स्क्वेअर फूट घराचे भाडे २०१४ साली १ लाख ६५ हजार ते २ लाख २० हजार दरम्यान होते. मात्र त्यानंतर बाजारात आलेल्या चढउतारांमुळे २०२१ या वर्षात वरळी आणि ताडदेव परिसरातील घरभाडे २ लाख ते २ लाख ७० हजार एवढे झाले आहे. मुंबईसोबतच पुणे, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली एनसीआर, हैदराबाद आणि कोलकाता या प्रमुख शहरांमधील घरांच्या किमतीदेखील वाढल्या आहेत. याबद्दल अ‍ॅनरॉकचे संस्थापक आणि अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले की, मागील सात वर्षांमध्ये देशात आर्थिक पातळीवर बरीच उलथापालथ झाली.

नोटाबंदी, जीएसटी, रेरा कायदा या सगळ्या गोष्टींचा परिणाम रियल इस्टेट क्षेत्रावरदेखील पाहायला मिळाला. त्यामुळेच मागील काही वर्षांमध्ये भांडवलाच्या किमती वाढल्या. त्यात मागील काही वर्षांमध्ये देशातील प्रमुख शहरांमध्ये लक्झरी लोकेशन असणाऱ्या घरांना ग्राहकांची मोठी पसंती मिळू लागली. परिणामी अशा परिसरांमधील घरांच्या व घरभाड्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. कोरोनाच्या काळात महत्त्वाच्या शहरांमधील बांधकाम क्षेत्रास मोठे नुकसान सहन करावे लागले. मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर बांधकाम क्षेत्र पुन्हा उभारी घेत आहे. बाजारांमधील या वाढीव किमतींमुळे बांधकाम क्षेत्रास पुन्हा नवी गती मिळणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

देशातील महत्त्वाच्या शहरांमधील घरभाडेnमुंबई - २०१४ मध्ये- २,२०,००० / २०२१ मध्ये- २,७०,०००nपुणे - २०१४ मध्ये- ५२,००० / २०२१ मध्ये- ६२,०००nबंगळुरू - २०१४ मध्ये- ४६,००० / २०२१ मध्ये- ५६,०००nचेन्नई - २०१४ मध्ये- ६२,००० / २०२१ मध्ये- ७४,०००nदिल्ली एनसीआर - २०१४ मध्ये- ६०,००० / २०२१ मध्ये- ७०,०००nहैदराबाद - २०१४ मध्ये- ४७,००० / २०२१ मध्ये- ५४,०००nकोलकाता - २०१४ मध्ये- ७४,००० / २०२१ मध्ये- ८८,०००