Join us  

अंधेरी-घाटकोपर जोड मार्गावर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या मार्गातील अडथळा दूर

By जयंत होवाळ | Published: March 05, 2024 6:14 PM

एन विभागातील ३८ अनधिकृत बांधकामे निष्कासित

मुंबई-अंधेरी-घाटकोपर जोड रस्ता परिसरातील पूर्व द्रुतगती मार्गाच्या रुंदीकरणात तसेच उड्डाणपुलाच्या उभारणीत अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एन' विभागामार्फत आज निष्कासित करण्यात आली आहेत. या कारवाईदरम्यान ३८ अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. या अतिक्रमणधारकांना बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे कारवाईआधी कळविण्यात आले होते. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त (परिमंडळ ६)  रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांच्या निर्देशनानुसार एन विभागात अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

पूर्व द्रुतगती मार्ग ते गोळीबार रस्त्यापर्यंत येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीसाठी ‘महारेल’  कडून अंधेरी-घाटकोपर जोड रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. त्यामुळे परिसरातील दोन्ही बाजूची वाहतूक गोळीबार रस्ता ते पूर्व द्रुतगती मार्ग अशी सुरू राहणार आहे. त्यासाठी अंधेरी-घाटकोपर जोड रस्ता पूर्व द्रुतगती मार्ग ते गोळीबार रस्त्यापर्यंत ४५.७ मीटरने रुंद करण्याचे काम सुरू आहे. या रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणधारकांना महानगरपालिकेच्या एन विभागाकडून वारंवार कळविण्यात आले होते. तसेच आतापर्यंत सात वेळा बैठका घेवून या कारवाईची कल्पना देखील देण्यात आली होती. मात्र तरीदेखील रुंदीकरणात अडथळा ठरणारी ही अनधिकृत बांधकामे जैसे थे होती. 

अखेर एन विभागाने कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईत ३८ पक्की बांधकामे निष्कासित करण्यात आली. यामुळे १०० मीटरचा रस्ता खुला झाला. आज झालेल्या कारवाईत एन विभागातील अतिक्रमण निर्मूलन पथकाचे अधिकारी, कर्मचारी तसेच ६० पोलीस अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. उर्वरित अनिधकृत बांधकामे देखील पुढील आठवड्यात काढण्यात येणार आहेत, अशी माहिती एन विभागाचे सहायक आयुक्त  बेल्लाळे यांनी दिली.

टॅग्स :अंधेरी