Join us  

काेराेनाबाधित औषधांनी बरा होणार असेल तर रेमडेसिविरची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 4:05 AM

तज्ज्ञांचा सल्ला; इंजेक्शन सरसकट दिले जात असल्याने मोठा तुटवडालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रेमडेसिविर इंजेक्शन हे औषध कोविड ...

तज्ज्ञांचा सल्ला; इंजेक्शन सरसकट दिले जात असल्याने मोठा तुटवडा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रेमडेसिविर इंजेक्शन हे औषध कोविड रुग्णांसाठी वापरण्यास शासनाची अनुमती आहे. त्याचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार गरजूंना हे औषध सहज उपलब्ध व्हावे, यासाठी काटेकोरपणे दक्षता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले असले तरी रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी सरसकट हे इंजेक्शन दिले जात असल्याने याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे, अशी माहिती आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. एखादा रुग्ण औषधांनी बरा होणार असेल तर त्याला इंजेक्शन देण्याची आवश्यकता नाही. या इंजेक्शनचा तुटवडा भासू नये, यासाठी हा उपाय उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. सना शेख यांनी सांगितले की, रेमडेसिविर हे जीवरक्षक इंजेक्शन समजले जात असल्याने काेराेनाबाधितांच्या नातेवाईकांची ते मिळवण्यासाठी धावाधाव सुरू आहे. २०१४ मध्ये आलेल्या इबोला या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती. त्यांच्यासाठी प्रभावी औषध म्हणून रेमडेसिविरचा वापर करण्यात आला होता. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) या इंजेक्शनला मंजुरी दिली होती. आता कोरोना रुग्णांसाठीही हे इंजेक्शन वापरले जात आहे. परंतु, रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी सरसकट हे इंजेक्शन दिले जात असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.

* हात स्वच्छ धुवा, मास्क वापरा

नातेवाईकांनी डॉक्टरांशी चर्चा करून गरज भासल्यास इंजेक्शन द्या. एखादा रुग्ण औषधांनी बरा होणार असेल तर त्याला इंजेक्शन देण्याची आवश्यकता नाही. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासू नये, यासाठी हा उपाय उपयुक्त ठरेल. याशिवाय मागणीही कमी होईल. नियमित हात स्वच्छ धुणे, मास्कचा वापर आणि सामाजिक अंतर राखणे, यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव राेखता येईल.

- डॉ. सना शेख

* पालिका रुग्णालयात तुटवडा नाही

रेमडेसिविरचा राज्यभरात तुटवडा जाणवत असल्याचे ऐकायला मिळाले आहे. खासगी रुग्णालयात ही समस्या अधिक उद्भवते. त्यामुळे यावर काय उपाय करता येईल, याबाबत ठरवणे गरजेचे आहे. परंतु, पालिकेच्या रुग्णालयात अद्याप तरी या इंजेक्शनचा तुटवडा नाही. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोविड रुग्णांना आवश्यकतेनुसार ते दिले जात आहे.

- डॉ. मिलिंद नाडकर, प्रमुख, औषधी वैद्यकशास्त्र, केईएम रुग्णालय

* संपर्क साधा, मदत मिळेल

ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्यास अथवा त्याचा काळाबाजार होत असल्यास त्यांनी संबंधित अन्न व औषध कार्यालयाच्या जिल्हा कार्यालयाशी अथवा प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. त्यांना औषध मिळवून देण्यास निश्चित मदत केली जाईल. काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाने स्पष्ट केले.

* आता बाहेरून इंजेक्शन मिळणे बंद

रेमडेसिविर रुग्णालयेच पुरवणार असल्याने आता मुंबईतील रुग्णालयांमध्येही इंजेक्शन मिळू लागले आहे. याआधीही कोरोनाबाधितालाच हे इंजेक्शन देण्यात येत होते. तसेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ते देण्यात येत नव्हते, असे मेडिकल चालकांचे म्हणणे आहे. विविध ब्रँडच्या इंजेक्शनच्या किमती वेगवेगळ्या असल्याने काही जण काळाबाजार करून फसवणूक करत होते. परंतु, आता हे इंजेक्शन बाहेरून मिळणार नसून रुग्णालयातूनच गरजू रुग्णांना मिळत आहे.

-------------------