पतीच्या नातेवाइकांना आरोपी करण्याची वृत्ती अधिक असते - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 02:48 AM2019-08-24T02:48:14+5:302019-08-24T02:48:33+5:30

घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रारदार महिलेची सासरच्यांनी छळवणूक करणे आवश्यक आहे. प्रत्येक घरात किरकोळ वाद होत असतात, मतांतर असते.

 The relatives of the husband have a higher tendency to accuse - the high court | पतीच्या नातेवाइकांना आरोपी करण्याची वृत्ती अधिक असते - उच्च न्यायालय

पतीच्या नातेवाइकांना आरोपी करण्याची वृत्ती अधिक असते - उच्च न्यायालय

Next

मुंबई : वैवाहिक वादात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतात. मात्र, पतीच्या कुटुंबाचा गुन्ह्यात सहभाग असो किंवा नसो पण जास्तीतजास्त सासरच्या नातेवाइकांना आरोपी करण्याची वृत्ती असते, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने सासू, नणंद, दीर, जाऊवर घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत नोंदविलेला गुन्हा रद्द केला.
घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रारदार महिलेची सासरच्यांनी छळवणूक करणे आवश्यक आहे. प्रत्येक घरात किरकोळ वाद होत असतात, मतांतर असते. मात्र, या बाबी ४९८ (अ) अंतर्गत नमूद केलेल्या ‘क्रूरते’च्या व्याख्येत बसत नाहीत. सासरच्यांनी केलेली प्रत्येक गैरवर्तणूक किंवा छळवणूक घरगुती हिंसाचारात मोडत नाही,’ असे निरीक्षण न्या. रणजीत मोरे व न्या. एन.एम. जमादार यांच्या खंडपीठाने नोंदविले.
कांचन आणि कामेश (बदललेले नाव) यांचा २००९ मध्ये विवाह झाला. कांचनच्या म्हणण्यानुसार, विवाहासाठी केलेला सात कोटींचा खर्च कांचनच्या वडिलांनी केला. त्यांच्या हनीमूनचा, जुहू येथील फ्लॅट नूतनीकरणासाठीचा सुमारे एक कोटींचा खर्च तिच्या वडिलांनी केला. तरीही सासरचे तिला ‘जाडी व काळी’ असे बोलत. प्रत्येक सणाला कपडे व दागिने मागत. वडिलांनी मागण्या मान्य केला. तरीही तिला ते ‘वांझ’ म्हणून टोमणा मारत.
कांचनने याबाबत जुहू पोलिसांत नवरा, सासू, दीर, जाऊ, नणंदेवर घरगुती हिंसाचार (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला. तो रद्द करावा, यासाठी सासरच्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सासरच्यांच्या वकिलांनी हे सर्व ओरोप फेटाळले. सासरच्यांचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य करीत म्हटले की, कांचन, कामेश वेगळे राहात होते. त्यांच्या घरी सासू, नणंद वारंवार जात नव्हते. त्यामुळे तिचा छळ करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.

पतीवरच्या गुन्ह्याविरुद्ध कारवाई सुरू राहणार
सासरचे छळ करतात, असा आरोप तक्रारदाराने केला आहे. मात्र, या त्रासामुळे तिने स्वत:ला नुकसान करण्याचा प्रयत्न केला, असे कुठेही नमूद करण्यात आलेले नाही. सासरचे कपडे आणि दागिने मागत, हा आरोप किरकोळ आहे. ती कपडे आणि दागिने देत नाही, म्हणून तिचा छळ करण्यात आला, असेही कुठे म्हणण्यात आले नाही, तसेच सासरचे तिला वांझ म्हणत, असेही तक्रारदाराने म्हटले आहे. मात्र, तिला कोणी, कुठे म्हटले आणि कोणत्या प्रसंगी म्हटले, याविषयीही काहीही उल्लेख नाही, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने सासरच्यांवरील गुन्हा रद्द केला. मात्र, पतीवर नोंदविण्यात आलेल्या गुन्हाविरुद्ध कारवाई सुरू राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Web Title:  The relatives of the husband have a higher tendency to accuse - the high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.