Join us  

आयटीआयसाठी ४० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:06 AM

प्रशिक्षणाला उपस्थित राहण्यासाठी रेल्वे प्रवासाची मागितली परवानगीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आयटीआय प्रवेश प्रक्रियेची नोंदणी १५ जुलैपासून सुरू ...

प्रशिक्षणाला उपस्थित राहण्यासाठी रेल्वे प्रवासाची मागितली परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आयटीआय प्रवेश प्रक्रियेची नोंदणी १५ जुलैपासून सुरू झाली असून, २२ तारखेपर्यंत तब्बल ४१ हजार ३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालयाकडून देण्यात आली आहे.

यंदा शासकीय आयटीआयमध्ये ९३ हजार तर खासगी आयटीआयमध्ये ५५ हजार अशा एकूण १ लाख ४८ हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. नोंदणी केलेल्या उमेदवारांमधील ३० हजार ६३ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज पूर्ण केले आहेत तर २७ हजार ६८० विद्यार्थ्यांनी शुल्क भरून प्रवेशअर्जाची नोंदणी निश्चित केली आहे.

दुसरीकडे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सरकारी, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) गुरुवारपासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे; मात्र मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात असणारे विद्यार्थी व पालकांना प्रवासाची परवानगी नसल्याने संस्थेत यायचे कसे? असा प्रश्न आहे. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षेच्या दृष्टीनेदेखील संस्था सुरू होणे आवश्यक असून, संस्था सुरू करताना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. आयटीआयचे अनेक अभ्यासक्रम हे प्रॅक्टिकल्सवर आधारित असतात. त्यामुळे हे विषय हजर राहूनच शिकवावे लागतात.

आयटीआय संस्थांमधील प्रॅक्टिकल प्रशिक्षणासाठी उमेदवार आणि निदेशक यांना संस्थेत उपस्थित रहावेच लागणार आहे. याबाबत कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव यांना पत्र दिले आहे. शासनाने याचा विचार करून त्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याच्या दृष्टीने येत्या २ ते ३ दिवसांत सकारात्मक निर्णय घ्यावा.

- दिगंबर दळवी , संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय