महाजॉब्स - नोंदणी २.७० लाखांची, रोजगार केवळ पाचशेंना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 05:47 AM2020-09-30T05:47:52+5:302020-09-30T05:48:04+5:30

उद्योग विभागाच्या ‘महाजॉब्स’वर भूमिपुत्रांच्या नशिबी प्रतीक्षाच

Registration of 2.70 lakhs, employment only for five hundred | महाजॉब्स - नोंदणी २.७० लाखांची, रोजगार केवळ पाचशेंना

महाजॉब्स - नोंदणी २.७० लाखांची, रोजगार केवळ पाचशेंना

Next
ठळक मुद्दे६ जुलै रोजी या पोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. अनेक परप्रांतीय कामगार त्यांच्या राज्यात निघून गेल्यानंतर भूमिपुत्रांना रोजगार देण्याचे काम याद्वारे केले जाईल, असा दावा होता.

यदु जोशी ।

मुंबई : राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या महाजॉब्स पोर्टलवर नोकरीसाठी तब्बल २ लाख ७० हजार तरुण-तरुणींनी नोंदणी केली पण त्यातील केवळ पाचशेंनाच प्रत्यक्ष रोजगार मिळाला.

६ जुलै रोजी या पोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. अनेक परप्रांतीय कामगार त्यांच्या राज्यात निघून गेल्यानंतर भूमिपुत्रांना रोजगार देण्याचे काम याद्वारे केले जाईल, असा दावा होता. आतापर्यंत २ लाख ७० हजार युवकांनी नोंदणी केली. त्यातील २२,३५५ जणांनी नोकरीसाठी अर्ज केले. याच पोर्टलवर नोकरी देण्यास तयार उद्योगांनाही नोंदणीचे आवाहन केले होते. या उद्योगांनी ४५०० कामगारांना नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू केली. प्रत्यक्षात ५०० जणांना रोजगार मिळाल्याचे शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर आहे. नोंदणी करणाऱ्यांत पदवीधरांचा मोठा भरणा असून त्यांच्याकडे उद्योगांना लागणारे कौशल्यच नाही. त्यामुळे अशांना रोजगार देण्यात पोर्टलवर नोंदणी केलेल्या उद्योगांना अडचणी येत आहेत. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर राज्यात ६५ हजार उद्योग सुरू झाले. ‘केवळ स्थानिकांनाच रोजगार देण्याचे बंधन आहे. लॉकडाऊनचा मोठा आर्थिक फटका आम्हाला बसला आहे, अशावेळी नवीन भरती करणे शक्य नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

अशी आहे टक्केवारी
नोंदणी केलेले आणि प्रत्यक्ष रोजगार मिळालेल्या युवकांची टक्केवारी काढल्यास केवळ .००२ टक्के युवकांनाच रोजगार मिळाला. नोकरीसाठी अर्ज केलेले युवक आणि रोजगार मिळालेले युवक यांचे प्रमाण काढले तर ते २.२ टक्के आहे.

माहिती पोर्टलवर टाकत नाहीत
जे उद्योग नोकरी देण्यासाठी नोंदणी करतात, युवकांना रोजगारही देतात पण त्यांनी किती युवकांना रोजगार दिला याची माहिती पोर्टलवर उद्योगांकडून टाकली जात नसल्याचे माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात महास्वयंम वेबपोर्टल, आॅनलाइन रोजगार मेळावे आदींमार्फत ५३,०४१ बेरोजगारांना रोजगार दिल्याचा दावा या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी केला.

Web Title: Registration of 2.70 lakhs, employment only for five hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.