Join us  

पुन्हा उभारी स्वराज्याच्या राजधानीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2023 10:29 AM

दुर्गराज रायगडाच्या जतन आणि संवर्धनाचे काम सध्या वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहे.

- संभाजीराजे छत्रपती, अध्यक्ष, रायगड विकास प्राधिकरण

दुर्गराज रायगडाच्या जतन आणि संवर्धनाचे काम सध्या वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहे. गडाचा विकास करताना त्याच्या घेऱ्यातील 21 गावांच्या विकासाचे कामही सुरू आहे. त्यातून स्वराज्याची ही राजधानी पुन्हा गतवैभव घेऊन झळाळून उठेल, असा विश्वास शिवप्रेमींना आहे. हे काम कसे हाती घेण्यात आले, त्याला कसा आकार मिळाला आणि एकेक गोष्ट बारकाईने कशी मार्गी लावली जाते आहे, यावर दृष्टिक्षेप...

सार्वजनिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने २००४ सालापासून  दुर्गराज रायगडवर माझे जाणे-येणे सुरू झाले. २००६ सालापासून तर  शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने नियमितपणे गडावर जात असे. मराठ्यांच्या या वैभवशाली राजधानीची दुरवस्था पाहून मन उदास व्हायचे. देशाचा हा मौल्यवान ठेवा जतन करण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत, असे सारखे मनात येत होते. शिवाजी महाराजांचा जबाबदार वंशज या नात्याने तसेच एक शिवभक्त म्हणून आपलं हे दायित्व तर आहेच! पण कर्तव्यसुद्धा आहे. ही भावनाच मला स्वस्थ बसू देत नसे.

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने लाखो शिवभक्त गडावर येत असतात. या सर्वांना एकत्रित करून, संघटित शक्ती निर्माण करून राजसदरेवर रिकाम्या असलेल्या मेघडंबरीत शिवछत्रपतींची पंचधातूची कायमस्वरूपी मूर्ती बसविल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आणि गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याची मागणी सातत्याने सरकारकडे करत होतो. या मागणीला शिवभक्तांचा भरभक्कम पाठिंबा मिळत असल्याचे पाहून २०१६ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित होते. त्यांनी रायगड किल्ल्यासाठी भरघोस निधी जाहीर केला. निधी योग्यप्रकारे खर्च करण्यासाठी रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना केली आणि त्याच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली.

या प्राधिकरणांतर्गत गडाचे जतन, संवर्धन, विकास व गडाच्या पायथ्याला असलेल्या २१ गावांसाठी मुलभूत सुविधा तयार करणे, याचा समावेश करण्यात आला. रायगडसाठी काम करण्याची मोठी संधी आपल्याला मिळाली आहे, या भावनेतून मी ही जबाबदारी अतिशय नम्रपणे स्वीकारली.

गडावर जाण्यासाठी पर्यटकांकडून जास्त वापरला जाणारा मार्ग म्हणजे चित्त दरवाजा ते महादरवाजा. महादरवाजा ते होळीचा माळ व नाणे दरवाजा ते मदार मोर्चा या दोन किलोमीटरच्या दगडी पायरी मार्गाचे पारंपरिक पद्धतीने काम पूर्ण करण्यात आले. तसेच गडावर दोन नवीन ऐतिहासिक थाटणीच्या फरसबंद जगदीश्वर मंदिराच्या आतील जुन्या फरसबंदीचा अभ्यास करून ती पूर्ण करण्यात आली आहे. पर्यटकांच्या सोयी-सुविधांसाठी स्वच्छतागृहे, तिकीटघर व पोलिस चौकी इ. कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

खाली पाचाड येथे असलेल्या माँसाहेब जिजामाता यांच्या समाधीचे जतन, संवर्धन पूर्ण करण्यात आले व त्या जागेचा भारतीय प्रजातीच्या लँडस्केपचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पर्यटक व शिवभक्तांसाठी पाचाड येथील धर्मशाळेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. पाचाड येथील ८८ एकरात साकारात असलेल्या शिवसृष्टीचे मास्टर प्लॅनिंग सुरू करण्यात आले आहे. घेऱ्यातील २१ गावांतील १६ पक्के रस्ते पूर्ण करण्यात आले आहेत. त्या गावांतील २१ विविधरूपी वारशाचे दस्तावेजीकरण सुरू करण्यात आले आहे.

गडावर ११ किलोमीटर लांबीच्या भूमिगत इलेक्ट्रिक केबलचे काम पूर्ण झाले आहे, साऊंड अँड लाइट शोच्या कथेला पुरातत्त्व विभागाची मंजुरी मिळाली असून, गडावरील त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच गडाच्या मुख्य वास्तूच्या बाह्य प्रकाशयोजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे.

रायगड विकास प्राधिकरणाचा अध्यक्ष म्हणून मागील काही वर्षांचा अनुभव पाहता, या प्राधिकरणाचा बराचसा कालावधी हा प्रशासकीय पातळीवर परवानगी घेणे, पूर्णवेळ कार्यकारी अभियंता नसणे, पुरातत्व विभागाच्या परवानगीसाठी लागणारा विलंब, जागेवर काम करत असताना इतक्या उंचीवर मटेरियलची ने-आण करण्यातील अडचणी यामुळे प्रत्यक्षात कामांच्या प्रगतीवर या सर्व गोष्टींचा परिणाम दिसून येतो. प्रामुख्याने पुरातत्व विभागाला गडावरील मुख्य वास्तू (core area) म्हणजे बालेकिल्ला, राजसदर, नगारखाना व बाजूच्या ओवऱ्यांचे पुरावे उपलब्ध असताना या वास्तूंचे शास्त्रोक्त जतन, संवर्धन व उत्खनन पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरणाने मिळून केल्यास ते वेळेत पूर्ण करता येणे शक्य आहे. पण याला अनेक बैठकांनंतरही चालना मिळत नाही, याची खंत वाटते.

असे सुरू आहे संवर्धनाचे काम

मागील चार ते पाच वर्षांत प्राधिकरणामार्फत स्वराज्याच्या राजधानीचा पुनर्शोध या व्हिजनद्वारे प्रथम गडाचे व खालील २१ गावांचे शास्त्रोक्त पद्धतीने उपग्रहाच्या मदतीने एरियल व ड्रोनच्या सहाय्याने दस्तावेजीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे गडाच्या शास्त्रोक्त जतन व संवर्धनाला चालना मिळाली. 

गडावर कोणतेही काम जर हाती घ्यायचे असल्यास पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात गडावर असलेल्या  शिवकालीन पाणवठ्यातील गाळ व गळती काढण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यापैकी २२ पाणवठ्यांचा गाळ काढण्यात आला. तसेच पारंपरिक बांधकाम साहित्याचा वापर करून मुख्य तीन मोठ्या तलावांची गळती काढण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे.

गडावरील मुख्य भागातील (core area) वास्तूचे जतन व संवर्धन हे भारतीय पुरात्तव विभागामार्फत व गडाच्या परिघातील (periphery area) मुख्य वास्तूचे जतन व संवर्धन हे रायगड विकास प्राधिकरणामार्फत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्याप्रमाणे प्राधिकरणामार्फत महादरवाजा, तटबंदी, खुबलढा बुरुज व नाणे दरवाजा या वास्तूंचे जतन व संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. 

त्यात विशेषतः इतिहासात नोंद असलेल्या, पडक्या स्वरूपात असलेला पालखीच्या नाणे दरवाजाचे शास्त्रोक्त जतन व संवर्धन कामात अन्वेषण करत असताना प्राधिकरणाला या दरवाजाच्या जवळपास ३०० हून अधिक निखळलेले चिरे पुढील दरीत आढळले.  हे चिरे बाहेर काढण्यात आले, त्यांचे सरासरी वजन जवळपास ३५० किलो इतके आहे. दस्तावेजीकरणामार्फत या चिऱ्यांची जागा निश्चिती करण्यात आली. त्यामुळे या सापडलेल्या पुराव्याच्या आधारे नाणे दरवाजा व बुरुजाची पुनर्बांधणी शेवटच्या टप्प्यात आहे.

 

टॅग्स :रायगडसंभाजी राजे छत्रपती