नामदेव मोरे, नवी मुंबईमहापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये अपेक्षित कर्जाचा आकडा मोठा करून तो उत्पन्नामध्ये गृहित धरला जातो. यामुळे अर्थसंकल्पाचा आकडा मोठा वाटतो व वर्षअखेरीस सदर रक्कम न मिळाल्यामुळे वास्तव उत्पन्नाचा सुधारित अर्थसंकल्प सादर केला जातो. गतवर्षीही प्रशासनाने २१०० कोटी ३१ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. परंतु उत्पन्नाचा अंदाज चुकल्यामुळे पुन्हा १७०९ कोटी २३ लाख रूपयांचा सुधारित अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पाकडे शहरवासीयांचे लक्ष लागलेले असते. पालिकेला किती उत्पन्न मिळणार व खर्च कसा केला जाणार याविषयी उत्सुकता असते. अर्थसंकल्पाचा आकडा प्रत्येक वर्षी वाढविण्यावर भर दिला जातो. परंतु अनेक वेळा उत्पन्नाचा अंदाज चुकत असतो. मागील काही वर्षांपासून विकासकामांसाठी कर्ज घेण्याची व जेएनएनयुआरएम अंतर्गत अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न केला जातो. अपेक्षित कर्ज व अनुदानाची रक्कम अर्थसंकल्पात उत्पन्न म्हणून दाखविली जाते. यामुळे अर्थसंकल्पाचा आकडा मोठा होतो. पालिकेची प्रगती मोठ्याप्रमाणात सुरू असल्याचे भासविले जाते. परंतु काही वर्षांपासून सातत्याने अर्थसंकल्पातील अंदाजित उत्पन्नाचे लक्ष मिळविण्यास अपयश आले आहे. परिणामी नवीन अर्थसंकल्प सादर करताना पहिल्यांदा गतवर्षीचा सुधारीत अर्थसंकल्पात वास्तवदर्शी आकडा मांडण्याची वेळ पालिका प्रशासनावर येत असते. अखेर पुढील वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना १५३६ कोटी रूपयांच्या सुधारीत अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. नवीन योजना तयार करताना मिळणारे अनुदान व अपेक्षित कर्ज हे उत्पन्नामध्ये गृहित धरावे लागते. त्यासाठी पाठपुरावा केला जाते. काहीवेळेस अपेक्षित निधी मिळत नाही असे उत्तर यासाठी सांगण्यात यते. परंतु प्रत्यक्षात मात्र वास्तवाचे भान सुटल्यामुळे अशाप्रकारचा अर्थसंकल्प सादर केला जात असल्याची टीका केली जात आहे. यावर्षी आयुक्तांनी वास्तवदर्शी अर्थसंकल्प मांडला असून कर्ज घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
उत्पन्नाचा अंदाज पुन्हा चुकला
By admin | Updated: February 14, 2015 01:34 IST