Join us  

वरळीतील गावडे मंडईला पडलाय फेरीवाल्यांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 3:17 AM

स्थानिक व्यापाऱ्यांसह ग्राहक त्रस्त : कारवाई करण्यास पालिकेची टाळाटाळ; वाहतूककोंडीचीही समस्या

- अजय परचुरेमुंबई : वरळीतील जी. एम. भोसले मार्गावर असणाºया बाळकृष्ण गावडे व्यापारी मंडईला सध्या फेरीवाल्यांचा विळखा बसला आहे. त्यामुळे वरळी नाक्याला लागून असलेल्या या मंडई परिसरातून चालताना नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणत्याही मंडईपासून १५० मीटरच्या आत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे. मात्र, या सर्व आदेशांना झुगारून हे फेरीवाले मंडईच्या दारातच आपले दुकान थाटून बसले आहेत. महानगरपालिका प्रशासनही या फेरीवाल्यांना हटविण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे या मंडईतील व्यापाºयांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.बाळकृष्ण गावडे व्यापारी मंडई ही पालिकेतर्फे पुनर्विकास झालेली (मार्च २०१५) पहिली मंडई आहे. २२ हजार स्क्वेअर फूट परिसरात असलेल्या या मंडईत एकूण १३० व्यापारी गाळे आहेत. मात्र, मंडई पुनर्विकसित होऊन पुन्हा सुरू झाल्यापासून फेरीवाल्यांनी मंडई भोवतालच्या जागेवर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. सध्या येथे इतके फेरीवाले वाढलेत की, प्रवेशद्वारावरून आत येताना ग्राहकांना अडसर निर्माण होत आहे.गावडे मंडईतील अधिकृत गाळे असणाºया व्यापाºयांचे यामुळे अतोनात नुकसान होत आहे. पाणीबिल, वीजबिल, महापालिकेचे टॅक्स, तसेच मंडईत कामाला असणाºया नोकरांचे पगार हा इतका खर्च असताना, फेरीवाल्यांमुळे या व्यापाºयांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. फेरीवाल्यांनी वाट अडवून ठेवल्याने गिºहाईक मंडईमध्ये येण्यास पाठ फिरवितात, तसेच मंडईला लागून असलेल्या फूटपाथवरच फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने, दुचाकी, चारचाकी या भागात उभी करण्यासाठीही जागा नाही. मंडईतील दुकानांत बाहेरील माल भरण्यासाठी रात्रीशिवाय पर्याय नसतो. अर्ध्या रस्त्यापर्यंत या फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने, वरळी नाका परिसरात वाहतूककोंडीचे चित्रही आता रोज पाहावयास मिळत आहे.मात्र, पालिकेला या मंडईच्या व्यापाºयांच्या अडचणींकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आत्तापर्यंत २०१५ पासून सतत या फेरीवाल्यांना हटविण्यासाठी पालिकेच्या जी-साउथ वॉर्ड विभाग कार्यालयात या व्यापाºयांनी खेटे घातले आहेत, परंतु तात्पुरती वरवरची कारवाई करण्यापलीकडे पालिकेने काहीही केलेले नाही. पालिकेचा अतिक्रमण विभाग या फेरीवाल्यांविरोधात कारवाई का करत नाही? पालिकेचे आणि फेरीवाल्यांचे यामागे काही साटेलोटे आहे का? असा सवाल गावडे मंडईतील व्यापाºयांनी उपस्थित केला आहे.दरम्यान, या बाबत जी साउथ वॉर्डचे सहायक आयुक्त देवेंद्र जैन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही.फेरीवाल्यांमुळे आम्हाला भयंकर आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. या फेरीवाल्यांना काही बोलायला जावे, तर दादागिरीची भाषा करतात. वाद निर्माण करत अंगावर धावून जातात. त्यांच्याविरोधात पालिका आणि पोलीस प्रशासनाकडे आम्ही बºयाच तक्रारी केल्या. मात्र, या फेरीवाल्यांना हटविण्यासाठी कुठलीही ठोस कारवाई महापालिका प्रशासनाकडून केलेली नाही. महापालिकेने त्वरित या फेरीवाल्यांना हटवावे, अशी आमची मागणी आहे.- किशोर गावडे, व्यापारीस्थानिक नगरसेवक म्हणून मी या फेरीवाल्यांमध्ये आणि मंडईतील व्यापाºयांमध्ये नेहमीच समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा कोणताच फायदा होत नाही. हे फेरीवाले मराठी भाषिक आहेत. पालिकेने त्यांचा योग्य तो विचार करावा, या मताचा मी आहे. आता महापालिकेनेच याबाबत योग्य तो तोडगा काढावा.- आशिष चेंबूरकर, शिवसेना नगरसेवक, वॉर्ड क्रमांक १९६

टॅग्स :बाजारफेरीवाले