Join us  

सौर प्रकल्पांसाठी ३,९९७ एकर जागांचे प्रस्ताव प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:06 AM

मुंबई : सौर प्रकल्पांसाठी तब्बल ३९९७ एकर जागांचे प्रस्ताव प्राप्त असून, शेती सिंचनाला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी सुमारे ५२०० मेगावॉट ...

मुंबई : सौर प्रकल्पांसाठी तब्बल ३९९७ एकर जागांचे प्रस्ताव प्राप्त असून, शेती सिंचनाला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी सुमारे ५२०० मेगावॉट सौर विजेचे महावितरणकडून लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी दोन ते दहा मेगावॉट क्षमतेच्या अनेक विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पांची राज्यभरात उभारणी करण्यास गती देण्यात आली आहे.

राज्यातील २७२५ उपकेंद्रांच्या ५ किलोमीटर परिघात कमीतकमी १०, तर जास्तीत जास्त ५० एकर क्षेत्रफळाच्या शासकीय व खासगी जमिनी भाडेपट्टीवर घेण्यात येत आहे. राज्य शासनाने नाममात्र एक रुपया भाडेपट्टीवर ३० वर्षांसाठी शासकीय जमिनी घेण्यास मंजुरी दिली आहे. वैयक्तिक, समूहगट, सहकारी संस्था तसेच ग्रामपंचायतींच्या मालकीच्या जमिनींसाठी प्रतिएकर प्रतिवर्ष ३० हजार रुपये भाडे देण्यात येत आहे. तसेच भाडेपट्टीमध्ये दरवर्षी ३ टक्के वाढ होणार आहे. भाडेपट्टीवर जमिनींच्या अर्ज व इतर प्रक्रियेसाठी महावितरणकडून स्वतंत्र लॅण्ड पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

आतापर्यंत राज्यातून सौर प्रकल्पांच्या जागांसाठी २४२ अर्जांद्वारे एकूण ३,९९८ एकर जागेचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या जागांची पाहणी करण्यात येत असून अर्ज मंजुरीची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु आहे, तर सौर प्रकल्पांसाठी १६८ एकर जमिनीचे १२ अर्ज मंजूर करण्यात आले आहे. आतापर्यंत विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पांसोबत ११८१ मेगावॉट क्षमतेचे करार झाले आहेत.

त्यापैकी ३३२ मेगावॉटचे सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्याद्वारे राज्यातील ८६ वीज वाहिन्यांवरील सुमारे ३८ हजार कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यात येत आहे. शेती सिंचनाला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्यातून विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पांच्या जागांसाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे, असा दावादेखील महावितरणकडून करण्यात आला आहे.

----------------

शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पांसोबत ११८१ मेगावॉट क्षमतेचे करार करण्यात आले आहेत. कृषिपंप वीज धोरणाच्या अंमलबजावणीसाठी १ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत कृषी ऊर्जा पर्वाच्या आयोजनास शेतकऱ्यांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. कृषी धोरण गावागावात व शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी ऊर्जा पर्वामध्ये महावितरणकडून जनजागरण व प्रबोधनाचे ६२१६ विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत.

----------------

कृषी ऊर्जा पर्वामध्ये ग्राहक मेळावे, ग्रामसभा, महिला सक्षमीकरण कार्यक्रम, सायकल रॅली, थेट बांधावर शेतकरी संवाद, एक दिवस देश रक्षकांसाठी, पथनाट्ये, ग्राहक संपर्क अभियान, लघुचित्रफित आदी कार्यक्रम घेण्यात आले आहे. थकबाकीमुक्तीसह या धोरणातील विविध तरतुदींचा लाभ घेण्याची गावागावांमध्ये ओढ लागली आहे.