जान्हवी मोर्ये, ठाणेमांगल्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या रांगोळीला दिवाळीत विशेष महत्त्व आहे. दिवाळी आली की प्रत्येक घरांचे अंगण रांगोळीने सजलेले दिसते. कोणी ठिपक्यांची तर कोणी संस्कार भारतीची रांगोळी काढतात. मात्र, सध्याच्या इन्स्टंट जमान्यात रांगोळीही इन्स्टंट झाली आहे. बाजारात खास इन्स्टंट रांगोळ्या आल्या आहेत. त्यांची क्रेझ धावपळीच्या जमान्यात वाढते आहे.प्लस्टिक, अॅक्रिलिक आणि मेटॅलिकच्या पत्र्यावर सिल्व्हर कोंटिग करून त्यावर रांगोळीच्या डिझाईन रेखून रंगविल्या जातात. या तयार रांगोळ्या १५० रूपयांपासून ते ९०० रूपयांपर्यत बाजारात उपलब्ध आहेत. रांगोळीच्या किंमतीत यंदा १० टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे असले तरी विक्रेत्यांनी रांगोळीची किंमत तीच ठेवून वजनात घट केली आहे. सफेद रांगोळीचा लहान ग्लास १० रूपयांना तर मोठा ग्लास २० रूपयांना आहे. रंगीत रांगोळीचे तीन छोटे चमचे १० रूपयांना मिळत आहेत. तर पांढऱ्या रांगोळीत रंग मिक्स केलेल्या रांगोळीचा एक ग्लास १० रूपयांना आहे. सध्या बाजारात प्लॅस्टिकचे ग्लास आले आहेत. त्यातून रंगीत रांगोळी ग्राहकांना दिली जाते. यामुळे रांगोळीत रंग भरताना सोयीचे होत असल्याने अनेक जणी या ग्लासची खरेदी करीत आहेत ज्यांचे रांगोळी खरेदी करण्याचे बजेट कमी आहे ते रांगोळीचे तयार स्टीकर्स खरेदीचा ही पर्याय निवडतात. हे स्टीकर्स साधारणपणे १० रूपयांपासून ते १०० रूपयांपर्यत आहेत. यंदा बाजारात रंगीत रांगोळीचे २१ रंग आले आहेत. दरवर्षी १८ रंग येतात. रंगाचा गडदपणा व सौम्यपणा यामुळे रंगात वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
स्त्रियांमध्ये रेडिमेड रांगोळ्यांची क्रेझ
By admin | Updated: October 15, 2014 23:36 IST