Ready for vaccination; Establishment of Task Force | लसीकरणासाठी सज्ज; टास्क फोर्सची स्थापना

लसीकरणासाठी सज्ज; टास्क फोर्सची स्थापना

मुंबई : कोरोना लसीकरणासंदर्भात महाराष्ट्र सरकारने सर्व तयारी केली असून लसीकरण आणि  तिचे वितरण याबाबत राज्यात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत दिली.

लसीबाबत सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत असे सांगून  मुख्यमंत्री  म्हणाले की, लसीकरणाच्या बाबतीत काही गोष्टींची स्पष्टता आवश्यक आहे. लसीची उपलब्धता, लसीची संख्या, लसीचे दुष्परिणाम, लसीवरील येणारा खर्च व त्याचे वितरण कसे करावे आदींबाबत केंद्र सरकारकडून मार्गदर्शन अपेक्षित आहे. राज्यात दोन टप्प्यात राबविण्यात आलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला असून संसर्ग रोखण्यात यश मिळाले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

टास्क फोर्स ठरवणार लसीकरणाचा प्राधान्यक्रम
कोविड लसीचे वितरण करणे ती देण्याबाबतचा प्राधान्यक्रम निश्चित करणे आणि त्या लसीची किंमत व प्रमाण ठरविण्यासाठी  मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. य़ा टास्क फोर्समध्ये वित्त,  नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य 
विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, आरोग्य सेवा आयुक्त, वैद्यकीय शिक्षण संचालक, डॉ. शशांक जोशी त्याचप्रमाणे जे.जे. आणि केईएम रुग्णालयाच्या प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध विभागांचे प्रमुख सदस्य असतील.

मुख्यमंत्र्यांचा भाजपवर हल्लाबोल!
कोरोनाची लाट पुन्हा येत असताना काही राजकीय पक्ष जनतेच्या जीवाशी खेळत आरोग्याचे नियम मोडत रस्त्यावर उतरून आंदोलने करीत आहेत त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांची एक बैठक घेऊन परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगावे व राजकारण न करता उपाययोजनांत सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्यात, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात भाजप कोरोनावरून राजकारण करीत असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारचे मंत्री, नेते करीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर एकप्रकारे भाजपवर हल्लाबोल केला.

35 काेटी सिरिंजची दरमहा निर्मिती

लस देण्यासाठी लागणाऱ्या सुयांबाबत भारत आत्मनिर्भर असल्याबाबत सुयांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या ऑल इंडिया सिरिंज ॲण्ड निडल मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशनने पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना 
पत्र लिहून आश्वस्त केले आहे. 
आम्ही आधीच वाढीव क्षमतेची तयारी केलेली आहे. लसीकरणासाठी दरमहा ३५ काेटी सुयांचे उत्पादन करण्यास आपण सक्षम असून, सिरिंजसाठी आपल्याला देशाबाहेर हण्याची गरज पडणार नाही, असे संघटनेने आश्वासन दिले आहे. 
संघटनेचे देशभरात सदस्य आहेत. संबंधित राज्यांना ते वेळेत सिरिंज उपलब्ध करतील, असे आश्वासन संघटनेने दिले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ready for vaccination; Establishment of Task Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.