Join us  

‘त्या’ जोडप्याच्या सुटकेसाठी आशेचा किरण ड्रग्ज प्रकरणाची होणार पुन्हा सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 4:05 AM

कतारमध्ये भोगत आहे शिक्षा : न्यायालयात होणार पुन्हा सुनावणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कतारमधील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या ...

कतारमध्ये भोगत आहे शिक्षा : न्यायालयात होणार पुन्हा सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कतारमधील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या मुंबईच्या निर्दोष जोडप्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे. केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून (एनसीबी) करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे या जोडप्याच्या ड्रग्ज प्रकरणावर पुन्हा सुनावणी घेण्याचा निर्णय कतारच्या न्यायालयाने घेतला आहे.

मुंबईकर असलेले मोहम्मद शरिक कुरेशी आणि त्यांची पत्नी ओनिबा कुरेशी दाम्पत्य उच्चशिक्षित आहे. ६ जुलै २०१९ रोजी कतारच्या दोहा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४ किलो चरससह या दाम्पत्याला पकडण्यात आले. या गुन्ह्यात त्यांना १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष म्हणजे, या काळात ओनिबा ही तीन महिन्यांची गर्भवती होती. २७ सप्टेंबर रोजी ओनिबाचे वडील शकील अहमद कुरेशी यांनी एनसीबीकडे धाव घेत आपली मुलगी आणि जावई निर्दोष असून, त्यांना यात अडकवल्याची तक्रार दिली.

शकील यांनी नातेवाईक तबसूम रियाज कुरेशी आणि तिचा साथीदार निजाम कारा यांच्यामुळे ते यात अडकल्याचा संशय व्यक्त केला होता. तबसूमने त्यांना कतारचे हनिमून पॅकेज लग्नाची भेट म्हणून दिले. सोबत कतारच्या नातेवाइकांकडे देण्यासाठी एक पार्सल दिले. कतारला नवीन सीमकार्ड घ्यावे लागणार असल्याने तेथेच साधा फोन विकत घेण्याचे ठरवत दोघांनी त्यांचे मोबाइल घरीच ठेवले. याच मोबाइलमध्ये तबसूम, निजाम कारा यांच्यातील संवादाचे रेकॉर्डिंग कुरेशी यांनी एनसीबीकडे दिले आहे.

कुरेशी यांच्या तक्रारीवरून एनसीबीचे क्षेत्रीय उपसंचालक के.पी.एस. मल्होत्रा यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. २२ डिसेंबर रोजी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुह्यांत निजाम कारा आणि तबसूमला १३ ग्रॅम कोकेनसह अटक केली, तर दुसरीकडे एनसीबीने ड्रग्ज रॅकेट प्रकरणात १ किलो ४७४ किलो चरसच्या तस्करीत वेद राम, महेश्वर, शाहनवाज गुलाम चोराटवाला आणि शबाना चोराटवाला यांना बेेड्या ठोकल्या.

एनसीबीचा पाठपुरावा

गेल्यावर्षी ७ सप्टेंबर रोजी निजामला जामीन मिळताच एनसीबीच्या पथकाने सापळा रचून त्याच्यावर लक्ष ठेवले. अखेर १४ ऑक्टोबर रोजी निजाम कारा आणि शाहिदा त्यांच्या हाती लागले. त्यांच्या चौकशीत त्यांनीच तबसूममार्फत कुरेशी दाम्पत्याला यात अडकवल्याचे स्पष्ट झाले आणि चरसची बॅग सोबत सोपवली. हाच धागा पकडून एनसीबी पथकाने कतार दूतावासाच्या मदतीने या जोडप्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. यात, कतारच्या न्यायालयाने याबाबत पुन्हा सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एनसीबीकडून याबाबतचे पुरावे सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे या जोडप्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे.

....