Join us  

‘खड्डेमुक्त रस्ते’ पालिकेपुढे आव्हानच! पावसाळ्यापूर्वी करणार ४०० रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 3:22 AM

पावसाळ्यापूर्वी मुंबई खड्डेमुक्त करण्याचा दावा यंदाही फुसका बार ठरण्याची शक्यता आहे. या वर्षी नवीन रस्त्यांऐवजी पुनर्पृष्ठीकरण आणि आवश्यकतेनुसार रस्ते दुरुस्तीचे काम पालिकेने हाती घेतले.

मुंबई : पावसाळ्यापूर्वी मुंबई खड्डेमुक्त करण्याचा दावा यंदाही फुसका बार ठरण्याची शक्यता आहे. या वर्षी नवीन रस्त्यांऐवजी पुनर्पृष्ठीकरण आणि आवश्यकतेनुसार रस्ते दुरुस्तीचे काम पालिकेने हाती घेतले. मात्र ही कामे संथगतीने सुरू असल्याने पावसाळ्यापूर्वी सुमारे चारशे मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीचे आव्हान महापालिका प्रशासनापुढे आहे.दरवर्षी पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांची दुरवस्था होते. याचा फटका वाहनचालक व पादचाºयांना बसत असतो. दोन वर्षांपूर्वी उघड झालेल्या रस्ते घोटाळ्यात मुंबईच्या रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली होती. त्यानंतर पालिका आयुक्त अजय मेहता यांनी रस्ते कामांच्या खर्चात कपात करून आवश्यकतेनुसार दुरुस्तीचा प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. त्यानुसार मुंबईतील चारशे प्रमुख रस्ते आणि ११६ रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण करण्यात येणार आहे.आयुक्तांनी निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसार मोठ्या प्रमाणात दुरुस्ती आवश्यक असलेले रस्ते प्रकल्प श्रेणीत, तर रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण आणि एखाद्या रस्त्यावरील खड्डा भरण्याचे काम प्राधान्य या श्रेणीत निश्चित करण्यात आले आहे. या चारशे रस्त्यांपैकी १३४ रस्ते आणि २० मुख्य रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. १५ मेनंतर नवीन खोदकामांना परवानगी मिळत नाही. त्यामुळे हाती घेतलेली कामे पूर्ण करणे अथवा रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ववत करण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका