Join us  

चाकूचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : साकीनाका, डोंबिवलीतील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी राज्य हादरून गेले असले तरी अशा घटनांना प्रतिबंध घालण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : साकीनाका, डोंबिवलीतील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी राज्य हादरून गेले असले तरी अशा घटनांना प्रतिबंध घालण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. मित्रासोबत फिरून घराकडे परतत असलेल्या एका तरुणीला चाकूचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आल्याची घटना चेंबूर कॅम्प परिसरातील नॅशनल सर्वोदया स्कूलजवळ शनिवारी पहाटे घडली. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत रात्रीपर्यंत त्या आरोपीला अटक केली.

धीरज राजकुमार सिंग (वय २४) असे या आरोपीचे नाव असून, तो पीडितेच्या परिचयातील आहे. त्यामुळे पाळत ठेवून त्याने हे कृष्णकृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. चेंबूर कॅम्प परिसरात राहणारी तरुणी मित्रासमवेत मरिन ड्राइव्ह येथे पहाटे फिरण्यासाठी गेली होती. चारच्या सुमारास दोघे परत चालत घराकडे येत होते. त्या वेळी नॅशनल सर्वोदया स्कूलसमोर धीरज सिंगने दोघांना अडविले. हातातील चाकूचा धाक दाखविल्याने तरुणीचा मित्र तेथून पळून गेला. त्यानंतर त्याने तरुणीला शाळेसमोरील गल्लीत ओढत नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. ही बाब कोणालाही न सांगण्याची धमकी देत तेथून पळून गेला. त्यानंतर संबंधित तरुणीने पोलीस ठाण्यात येऊन घडलेला प्रकार सांगितला. निरीक्षक सुनील जाधव, उपनिरीक्षक शिंदे यांनी तातडीने वरिष्ठांना घडलेल्या प्रकाराची कल्पना देत तपास सुरू केला. त्यांनी घटनास्थळी भेट देत आरोपीला शोधण्यासाठी दोन स्वतंत्र पथके बनवली. त्यांनी रात्री धीरज राजकुमार सिंगला एका ठिकाणी लपून बसला असताना पकडले. त्याला चेंबूर पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणाचा तपास निरीक्षक मनीषा शिर्के यांच्याकडे देण्यात आला आहे. आरोपीला रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.