Join us  

शाळकरी मुलाकडून खंडणी वसुली

By admin | Published: September 02, 2015 3:06 AM

शाळकरी मुलाकडून खंडणी उकळणाऱ्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिंडोशी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली. गेल्या १५ दिवसांपासून हे दोघे या शाळकरी विद्यार्थ्याला

गौरी टेंबकर-कलगुटकर, मुंबईशाळकरी मुलाकडून खंडणी उकळणाऱ्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिंडोशी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली. गेल्या १५ दिवसांपासून हे दोघे या शाळकरी विद्यार्थ्याला धमकावून त्याच्याकडून पैसे उकळत होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील पीडित विद्यार्थी मालाडच्या एका शाळेमध्ये पाचव्या इयत्तेत शिकतो. याच शाळेतून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आणि सध्या अकरावीच्या वर्गात शिकणारे दोन विद्यार्थी हे या शाळेच्या बाहेर येऊन उभे राहायचे. पीडित मुलाकडे पैशांची मागणी करायचे, त्यासाठी दमदाटीही करायचे. अशाच प्रकारे त्यांनी पीडित मुलाकडून गेल्या १५ दिवसांपासून सुमारे ७ हजार रुपये उकळले. पीडित विद्यार्थी कधी प्रोजेक्ट्स तर कधी अन्य काही शुल्क भरण्याचे कारण सांगत घरातून पैसे मागून आणत होता. मात्र वारंवार पैशांच्या मागणीमुळे हा विद्यार्थी तणावाखाली होता. त्याने घरच्यांशी बोलणे सोडले. त्यामुळे त्याच्या घरच्यांना संशय आल्याने त्यांनी मुलाला विश्वासात घेऊन या प्रकरणी विचारणा केली तेव्हा घडलेला प्रकार त्याने पालकांना सांगितला. त्यानुसार त्यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार केली. या प्रकरणी सोमवारी दोन १७वर्षीय मुलांना अटक केली असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करत त्यांना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. तसेच या शाळेच्या प्रशासनालाही मुलांच्या सुरक्षेसाठी योग्य ते पाऊल उचलण्याची विनंती केली आहे, अशी माहिती दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. असा काही प्रकार अन्य विद्यार्थ्यांसोबत घडला आहे का? याचीही चौकशी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.