Join us

कणखर पोलीस आयुक्त राकेश मारिया

By admin | Updated: April 26, 2015 01:57 IST

एका तरुणीचे चक्क पोलिसांनीच केलेले अपहरण, लूटमार, उकळलेली खंडणी आणि अखेरीस तिच्यावरील लैंगिक अत्याचार...

एका तरुणीचे चक्क पोलिसांनीच केलेले अपहरण, लूटमार, उकळलेली खंडणी आणि अखेरीस तिच्यावरील लैंगिक अत्याचार... मुंबईत घडलेल्या या संतापजनक घटनेने पुन्हा एकदा पोलीस दल हादरले आहे. या घटनेने खाकी वर्दीवर चिखल उडवला आहे. मात्र याच घटनेतून पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या रूपाने वर्दीतील कणखर अधिकारी पाहावयास मिळाला आहे. साकीनाका पोलीस ठाण्याच्या तीन पोलिसांनी अन्य साथीदारांच्या मदतीने ३ एप्रिलला एका तरुणीचे हॉलीडे इन हॉटेलबाहेरून अपहरण केले. तू वेश्या आहेस, असा आरोप करत त्यांनी तिला पोलीस चौकीत आणले. तिच्याकडील सुमारे पाच लाखांच्या मौल्यवान वस्तू काढून घेतल्या. तिच्या मित्राकडून साडेचार लाखांची खंडणी उकळली. एवढ्यावरच न थांबता नंतर एकांताचा फायदा घेत त्यांनी या तरुणीवर लैंगिक अत्याचारही केले. या धक्क्यातून सावरल्यानंतर तरुणीने आयुक्त राकेश मारिया यांना मी अडचणीत आहे, मला मदतीची गरज आहे, असा एका वाक्याचा एसएमएस धाडला. सर्व कामे बाजूला सारत मारिया यांनी तत्काळ तरुणीला फोन फिरवला. घडला प्रकार थोडक्यात जाणून घेत तिला दुसऱ्या दिवशी आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. कार्यालयात आलेल्या या तरुणीने सविस्तरपणे मारिया यांना घडलेली सारी हकीगत सांगितली. ते ऐकून मारिया अस्वस्थ झाले. कारण या तरुणीची तक्रार त्यांच्याच हाताखालच्या अधिकाऱ्यांविरोधात होती. तीही लैंगिक अत्याचाराची, खंडणी उकळल्याची. मात्र त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलीस आयुक्तपदाला साजेसे आदेश दिले. तत्काळ गुन्हे शाखेच्या वरिष्ठ निरीक्षक गोपिका जहागीरदार यांना बोलावून घेत त्यांच्याकरवी तरुणीचा जबाब नोंदवून घेतला. आपल्याच खात्याच्या अधिकाऱ्यांविरोधात तत्काळ गुन्हा नोंदविण्याचे आदेश त्यांनी दिले. विशेष म्हणजे कोणतीही कसर न ठेवता अत्यंत वेगवान हालचाली करून त्यांना गजाआड करण्याचे आदेशही सोडले. या प्रकरणात दोन साहाय्यक पोलीस निरीक्षक व एका शिपायावर गुन्हा नोंद झाला. गुन्हा कोणीही केला तरी त्याचे खापर दलाच्या प्रमुखावर फोडले जाते. या प्रमुखावर टीकेची झोड उठते, बदली करण्यासाठी सरकारवर दबाव येतो. बहुचर्चित सुनील मोरे प्रकरणातही तत्कालीन पोलीस आयुक्त अनामी रॉय यांच्याविरोधात सर्वच स्तरांतून प्रखर टीका झाली होती. जनता रस्त्यावर उतरली. ‘मुर्दाबाद, हटा दो’च्या घोषणा दिल्या गेल्या. या पार्श्वभूमीवर आपल्याच सहकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश देताना मारियांनी जराही कच खाल्ली नाही. उलट जिथे कुठे असतील तिथून पकडा, अटक करा, असेच आदेश ते देत होते. गुन्हा करणारा पोलीस का असेना त्याच्यावर कारवाई होणार, हा संदेश मारिया यांनी दिला. त्यातून त्यांनी जनतेचा विशेषत: महिलांचा विश्वास जिंकला, असे म्हणता येईल. या वर्षी जानेवारीत लालबाग-परळमध्ये जातीय तणाव निर्माण झाला होता. त्यातून काही ठिकाणी तोडफोड, मारहाणीचे प्रकार घडले. क्षणात या घटनेची माहिती सर्वदूर पसरली. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवांना पाय फुटले. त्या परिस्थितीत मारिया स्वत: दंडुका घेऊन रस्त्यावर उतरले. त्यांच्या या कृतीने कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांचे मनोधैर्य उंचावलेच. पण दंगल घडवू पाहणाऱ्यांमध्येही दहशत निर्माण झाली. ही दंगल आटोक्यात आणल्यानंतर राजकीय दबाव, हस्तक्षेप झुगारत त्यांनी दोन्ही गटांमधील दंगलखोरांविरोधात धडाधड गुन्हे दाखल करणे सुरू केले. सोशल मीडियावरून अफवा पसरविणाऱ्या समाजकंटकांविरोधात तर त्यांनी धडक मोहीम उघडली. अफवा पसरविणारे कोणत्याही गटाचे असोत त्यांना गजाआड करणारच, असा निर्धार त्यांनी केला. एकदा कारवाई झाल्यानंतर पुन्हा अफवा पसरविण्याची हिंमत कोणी करणार नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. पोलीस आयुक्त म्हणून निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा कर्तव्यकठोरपणे आणि त्याचचेळी संवेदनशीलतेने प्रकरण हाताळण्याचे त्यांचे कसब दिसून येते.१पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारताच त्यांनी महिला, लहान मुले आणि वृद्धांच्या सुरक्षेला जास्तीत जास्त प्राधान्य द्या, असा हुकूम काढला होता. गुन्हा कुठेही घडो, हद्दीची सबब पुढे न करता तो नोंदवा आणि नंतर संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग करा, असेही आदेश दिले. पोलीस ठाण्यातील पोलिसी खाक्याचे वातावरण पाहून अनेकदा तक्रारदार पुढे येत नाहीत. हे वातावरण बदलण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांसह विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याच्या स्वागतकक्षात बसविले. २याशिवाय हरविलेल्या व्यक्तींना शोधण्यापासून स्ट्रीट क्राइम रोखण्यापर्यंत विविध योजना यशस्वीपणे राबविल्या. हे करताना त्यांनी शिस्त, कर्तव्याचे अचूक पालन याचा आग्रह धरला. बेशिस्त, कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्यांनी कठोर कारवाईही केली. मारियांप्रमाणेच प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याने आपले कर्तव्य अचूकपणे बजावले तर जनता आणि पोलिसांमधली दरी कमी होईल. पर्यायाने गुन्हेगारीला निश्चितच आळा बसू शकेल.जयेश शिरसाट