Join us  

नाणार प्रकल्पासाठी राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर रत्नागिरी राजापूर रिफायनरीसारखा प्रकल्प हातातून गमावणे ना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर रत्नागिरी राजापूर रिफायनरीसारखा प्रकल्प हातातून गमावणे ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला. राज्याचे दीर्घकालीन हित लक्षात घेऊन या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केले.

पर्यावरणाचा ऱ्हास, कोकणातील जमिनी आणि प्रकल्प परिसरातील मंदिरांच्या भवितव्याबाबत असलेल्या शंका यामुळे नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला. भाजप वगळता शिवसेनेसह सर्वच पक्षांनी प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतल्याने तब्बल तीन लाख कोटींची गुंतवणूक असणारा हा तेलशुद्धीकरण प्रकल्प सध्या वादात अडकला आहे. यासंदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून प्रकल्पासाठी जनमत तयार करण्याचे आवाहन केले. कोरोनामुळे सर्वच संदर्भ बदलले आहेत. लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. कोकणातील तरुणांना रोजगारासाठी मुंबई, पुण्याची वाट धरावी लागते. शासनही आर्थिक चणचणीचा सामना करत आहे. अशा प्रसंगी राज्य ठामपणे उभे राहण्यासाठी आपण वेगळ्या दृष्टिकोनातून उद्योगांकडे आणि प्रकल्पांकडे पाहायला हवे, असे सांगतानाच आज एकही नवा उद्योग अथवा एकही परदेशी गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर जाणे परवडण्यासारखे नाही. अन्यथा ‘औद्योगिकरणात अग्रेसर महाराष्ट्र’ ही राज्याची ओळख पुसायला वेळ लागणार नाही, असा धोकाही राज यांनी पत्रात व्यक्त केला.

राज्य सरकारने आता सामंजस्याची भूमिका घेऊन तज्ज्ञांच्या मदतीने स्थानिकांच मत बदलवावे. हे करताना संघर्षाची भूमिका अजिबात घेऊ नये. शिवाय, कोकणाच्या पर्यटनासाठी समग्र धोरण ठरवून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी राज यांनी केली. राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्यास मनसेचा त्याला पूर्ण पाठिंबा असेल, असे आश्वासन राज यांनी दिले. तसेच, कोकणी माणसाच्या विकासाच्या आड कोणी आल्यास मनसेशी संघर्षाची तयारी ठेवावी, असा इशारही त्यांनी पत्रात दिला.

दरम्यान, सोमवारी स्थानिक जनतेच्या शिष्टमंडळ राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’वर भेट घेणार आहे. प्रकल्पग्रस्तांचा विरोध मावळत असून, स्थानिक नागरिक प्रकल्पाच्या बाजूने असल्याची चर्चा सुरू आहे. अलीकडेच शिवसेनेचे स्थानिक आमदार राजन साळवी यांनी प्रकल्पाच्या बाजूने भूमिका घेतली होती. मात्र, शिवसेनेच्या काही नेत्यांनी विरोधात मते व्यक्त केल्यावर साळवी यांना घुमजाव करत पक्षनेतृत्वाचा निर्णय शिरोधार्य असल्याचा खुलासा करावा लागला होता.

------------------------