Raj Thackeray will not interested contest assembly election? | राज ठाकरे विधानसभा लढवण्यास 'मनसे' उत्सुक नाहीत?; नेत्यांच्या मनात वेगळीच भीती  
राज ठाकरे विधानसभा लढवण्यास 'मनसे' उत्सुक नाहीत?; नेत्यांच्या मनात वेगळीच भीती  

मुंबई - लोकसभा निवडणुकीत एकही जागा न लढवणारे, पण प्रचाराचं मैदान गाजवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही, याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. युती आणि आघाडीची मोर्चेबांधणी जोरात सुरू असताना, राज ठाकरेंच्या 'आदेशा'ची मनसैनिक आतुरतेनं वाट बघताहेत. परंतु, राज ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्यास फारसे उत्सुक नसल्याचं सूत्रांकडून समजतं. आज कृष्णकुंजवर झालेल्या बैठकीत राज ठाकरेंचा सूर फारसा सकारात्मक नव्हता. उलट, मनसे पदाधिकाऱ्यांना पैसे जपून वापरण्याचा सूचक सल्ला त्यांनी दिला आणि बहुतांश पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळल्याचं कळतं. अर्थात, काही पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवण्याची भावना व्यक्त केलीय, पण त्यावर काही नेत्यांनी वेगळीच भीती बोलून दाखवल्यानं कुठल्याही निर्णयाविनाच बैठक संपवावी लागली.

2009 मध्ये पहिल्यांदाच विधानसभा लढवणाऱ्या मनसेने घवघवीत यश मिळवले होते. मात्र 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोदीलाटेमध्ये मनसेचा केवळ एक आमदार निवडून आला होता. दरम्यान, गेल्या काही काळापासून राज ठाकरे यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. तसेच लोकसभा निवडणुकीत मनसेने निवडणूक लढवली नसली तरी राज ठाकरे यांनी भाजपा आणि मोदींविरोधात जोरदार आघाडी उघडली होती. त्याचा निकालावर फार प्रभाव पडला नसला तरी राज ठाकरेंच्या भाषणांची खूप चर्चा झाली होती. 

दरम्यान, आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे पुन्हा एकदा भाजपाविरोधात छड्डू ठोकतील, अशी अपेक्षा होती. मात्र आज झालेल्या मनसेच्या बैठकीत  विधानसभा निवडणूक न लढण्याचा सूर आळवला गेला. सध्या मनसेची आर्थिक परिस्थिती कठीण आहे. या कठीण आर्थिक परिस्थितीत निवडणूक लढवणेही कठीण आहे, असे सूचक विधान राज ठाकरे यांनी केले. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनीही त्यांच्याशी सहमती दर्शवली. मात्र काही जणांनी निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली.  मात्र या बैठकीत निवडणूक लढण्याबाबत राज ठाकरेंनी अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही. तर आज केवळ पदाधिकाऱयांची मतं जाणून घेतली आहेत. 

सध्याच्या परिस्थितीत सर्वच जागा लढवण्यापेक्षा काही जागा लढवाव्यात, असे मत काही पदाधिकाऱ्यांनी मांडले. पण काही जागा लढून त्या सर्व जागांवर पराभव झाल्यास पक्षाची नाचक्की होण्याची भीतीही बैठकीत व्यक्त केली गेली.

या बैठकीत राज ठाकरे यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. ''सध्या देश रशियाचे पुतीन आणि अरब राष्ट्र चालवत आहेत. संघालाही देशात सुरु असलेल्या परिस्थितीचा अंदाज येत नाही आहे. आर्थिक संकटामुळे देशातील उद्योगपतीही भीतीखाली आहेत '' असे मत त्यांनी व्यक्त केले.  

बैठकीत निवडणूक लढण्याबाबत राज ठाकरेंनी अजून अंतिम निर्णय घेतलेला नाहीये, पदाधिकाऱयांची मतं जाणून घेतली आहेत.

Web Title: Raj Thackeray will not interested contest assembly election?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.